पॅरिस : भारतीय हॉकी संघानं (Indian Hockey Team) पॅरिस ऑलिम्पिकच्या (Paris Olympics) उपांत्य फेरीत धडक दिली आहे. भारतानं ग्रेट ब्रिटनला पेनल्टी शुट आऊटमध्ये 4-2  असं पराभूत केलं. हरमनप्रीत सिंहच्या (Harmanpreet Singh) नेतृत्त्वात भारतीय संघानं ग्रेट ब्रिटनला उपांत्य पूर्व फेरीत पुन्हा पराभूत करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. भारतानं पेनल्टी शुट आऊटमध्ये विजय मिळवल्यानंतर खेळाडूंनी जंगी सेलिब्रेशन केलं.  भारतीय हॉकी संघाचा खेळाडू सुमित कुमार (Sumit Kumar) यानं जर्सी काढून हवेत फिरवली. यामुळं अनेकांना 2002 मध्ये सौरव गांगुलीनं लॉर्डसवर जर्सी काढून फिरवल्याची आठवण झाली. 


भारत उपांत्य फेरीत, सुमितचं अनोखं सेलिब्रेशन


भारत आणि ग्रेट ब्रिटन टोक्यो ऑलिम्पिक प्रमाणं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये देखील उपांत्यपूर्व फेरीत आमने सामने आले होते. भारताचा कॅप्टन हरमनप्रीत सिंग यानं 22 व्या मिनिटाला पहिला गोल केला. यानंतर ग्रेट ब्रिटनच्या ली  मॉर्टन यानं 27 व्या मिनिटाला गोल करत मालिकेत बरोबरी साधली. यानंतर ग्रेट ब्रिटननं आक्रमक खेळ केला. मात्र, भारताचा गोलकीपर पीआर श्रीजेश आणि बचाव फळीच्या खेळाडूंनी ग्रेट ब्रिटनला गोल करु दिला नाही. यामुळं मॅच पेनल्टी शुट आऊटमध्ये गेली. भारतानं पेनल्टी शुट आऊटमध्ये ग्रेट ब्रिटनचा4-2 असा पराभव केला. यानंतर भारताच्या खेळाडूंनी जंगी सेलिब्रेशन केलं. यावेळी सुमित कुमारनं जर्सी काढून गोल गोल फिरवली. सुमितच्या या अनोख्या सेलिब्रेशनमुळं क्रीडा रसिकांना सौरव गांगुलीची आठवण झाली. गांगुलीनं लॉर्डसवर इंग्लंडला पराभूत केल्यानंतर जर्सी काढून फिरवत जल्लोष केला होता.  


नेटकऱ्यांना सौरव गांगुलीची आठवण


सुमित कुमारनं विजयाचं सेलिब्रेशन केल्यानंतर त्याचा आणि भारतीय क्रिकेट टीमचा माजी कॅप्टन सौरव गांगुली यांचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. भारतानं नॅटवेस्ट ट्रॉफीच्या अंतिम फेरीत 2002 मध्ये इंग्लंडला पराभूत केल्यानंतर सौरव गांगुलीनं जंगी सेलिब्रेशन केलं होतं. लॉर्डसच्या स्टेडियमच्या गॅलरीत जर्सी काढून गांगुलीनं अनोख्या पद्धतीनं जल्लोष केला होता. गांगुलीनं तशी कृती करत इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू अँण्ड्रू फ्लिंटॉफचा  हिशोब चुकता केला होता. फ्लिंटॉफनं मुंबईत झालेल्या मॅचमध्ये विजयानंतर वानखेडे स्टेडियमवर विजय मिळवल्यानंतर जर्सी काढून  जल्लोष केला होता. 


भारत सुवर्णपदकापासून दोन पावलं दूर


भारतीय हॉकी संघानं टोक्यो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक मिळवलं होतं.  भारतानं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीत भारतीय हॉकी संघानं विजय मिळवल्यास सुवर्णपदकावर नावं कोरु शकतात. भारतानं हॉकीमध्ये आठ सुवर्णपदकं जिंकली आहेत. 






संबंधित बातम्या :



 

टीम इंडियाकडून ग्रेट ब्रिटनचा धुव्वा, पॅरिस ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत धडक