पॅरिस :  भारतासाठी (India) पॅरिस ऑलिम्पिकचा (Paris Olympics)12 दिवस निराशाजनक ठरला होता. मात्र, आज पॅरिसमधून क्रीडा चाहत्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. भारताचा कुस्तीपटू अमन सहरावत (Aman Sehrawat) यानं 57 किलो फ्री स्टाईल प्रकारात उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. आज रात्री अमन सहरावत उपांत्य फेरीचा सामना खेळणार आहे. या सामन्याकडे लाखो भारतीयांच्या नजरा लागल्या आहेत. 


भारताचा युवा कुस्तीपटू  अमन सहरावत यानं  57 किलो वजनी गटात फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात उपांत्य फेरीत प्रवेश करुन आणखी एका पदकाची आशा उंचावली आहे. अमन सहरावत यानं उपांत्यपूर्व फेरीत अल्बेनियाच्या जेलिमखान अबाकारोव याला 12-0 नं पराभूत करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.


अमन सहरावत आता उपांत्य फेरीत जपानचा अग्रमानांकित पैलवान रेई हिगुची याच्यासोबत होणार आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताकडून अमन सहरावत हा एकमेव पैलवान पात्र ठरला होता. उपांत्यपूर्व फेरीत अबाकारोवला सहजपणे पराभूत केलं. 


अमन सहरावत यानं पात्रता फेरीत मैसेडोनियाच्या व्लादिमीर इगोरोव याला पराभूत करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. अमन सहरावत यानं पहिल्या मॅचमध्ये दमदार कामगिरी करत 10-0 नं विजय मिळवला. अमन सहरावत यानं दमदार कामगिरी केल्यानं इगोरोवला अडचणींचा सामना करावा लागला. 


अमनकडून पदकाची आशा 


भारताकडून पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळणाऱ्या महिला पैलवानांना पदक मिळवण्यात अपयश आलं आहे. निशा दहिया हिला पंचांच्या निर्णयाचा फटका बसला. अमित पंघाल चांगली कामगिरी करु शकली नाही. तर, विनेश फोगाटला तिचं वजन जास्त ठरल्यानं स्पर्धेतून निलंबित करण्यात आलं. त्यामुळं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला कुस्ती क्रीडा प्रकारात पदकाची आशा अमन सहरावत याच्याकडून आहे. अमन सहरावत हा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताकडून पात्र ठरलेला एकमेव पैलवान आहे. त्यामुळं भारताला त्याच्याकडून पदकाची आशा आहे. 


भारत आणि स्पेनची हॉकीची लढत सुरु


भारत आणि स्पेन यांच्यात हॉकीमधील कांस्यपदकाची लढत सुरु झाली आहे. भारतानं टोक्यो ऑलिम्पिकमध्ये  जर्मनीला पराभूत करत कांस्य पदक जिंकलं होतं. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये देखील भारताला कांस्य पदकाची आशा आहे. तर, दुसरीकडे आज रात्री भारताला भालाफेक क्रीडा प्रकारात नीरज चोप्राकडून सुवर्णपदकाची आशा आहे. नीरज चोप्रानं टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं होतं. 


संबंधित बातम्या : 


आधी बोचरा वार अन् आता कौतुकाची उधळण, विनेशसाठी कंगनाची खास पोस्ट

 

कुस्तीपटू विनेश फोगाटला भारतरत्न आणि राज्यसभेची खासदारकी मिळणार?