Kangana Ranaut On Vinesh Phogat : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगट (Vinesh Phogat) हिला अंतिम सामन्यापूर्वी अपात्र ठरवण्यात आल्याने भारतीयांना मोठा धक्का बसला. विनेशचे ऐतिहासिक ऑलिम्पिक पदक हिरावल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली. अपात्र ठरल्यानंतर विनेशच्या बाजूने, तिला धीर देणारे पोस्ट सोशल मीडयावर मोठ्या प्रमाणावर आल्या. अंतिम सामन्यापूर्वी विनेश फोगटवर उपरोधिक टीका करणारी अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranaut) मात्र विनेशचे कौतुक केले आहे. कंगनाने विनेशला 'शेरनी' (वाघिण) असे संबोधले आहे.
विनेश फोगटला अंतिम सामन्यापूर्वी 100 ग्रॅम वजन अधिक असल्याने तिला अपात्र ठरवण्यात आले. ऑलिम्पिक समितीच्या या निर्णयाने विनेशसह भारतातील कोट्यवधी लोकांना धक्का बसला. ऑलिम्पिक समितीच्या या निर्णयावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली. सिनेसृष्टीतूनही या अशा निर्णयावर आश्चर्य व्यक्त करण्यात आले. अनेकांनी विनेशचे कौतुक करत तिचे मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न केला.
कंगनाने केले विनेशचे कौतुक...
भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौतने विनेश फोगटाला 'शेरणी' असे संबोधले. त्याशिवाय, कंगनाने आणखी पोस्ट आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केली आहे. या पोस्टमधील व्यंगचित्रात रडू नको विनेश, देश तुझ्यासोबत असल्याचे म्हटले आहे. कंगनाने विनेशचे कौतुक करणारे, धीर वाढवणारी पोस्ट शेअऱ केल्याने अनेकांनी तिचे कौतुक केले आहे.
याआधी कंगनाने केली होती टीका...
विनेश फोगटने ऑलिम्पिकच्या अंतिम सामन्यात धडक मारल्यानंतर कंगनाने तिच्यावर उपरोधिक टीका करणारी पोस्ट लिहिली होती. कंगना रणौतने म्हटले की, अंतिम फेरीत पोहोचल्याबद्दल विनेश फोगटचे अभिनंदन. एक काळ असा होता की विनेशने आंदोलनात भाग घेतला होता, ज्यामध्ये 'मोदी तेरी कबर खोदणार' अशा घोषणा देऊनही तिला देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. यानंतर कंगना रणौतलाही सोशल मीडियावर ट्रोलचा सामना करावा लागला.
वजन जास्त भरल्यामुळे विनेश फोगाट ऑलिम्पिकमधून अपात्र
कुस्तीपटू विनेश फोगट हिला ऑलिम्पिकमध्ये अपात्र घोषित करण्यात आलं. 50 किलो गटात तिचं वजन सुमारे 100 ग्रॅम अधिक असल्याचं आढळून आलं. विनेशला सुवर्णपदक जिंकण्याची संधी होती, पण वजन जास्त असल्यानं अंतिम सामन्याच्या काही तास आधीच तिला अपात्र ठरवण्यात आलं. अशा परिस्थितीत नियमांमुळे उपांत्य फेरीत धमाकेदार विजय मिळवूनही विनेशचं 'गोल्ड'न स्वप्न भंगलं आणि कोट्यवधी भारतीयांच्या स्वप्नांचाही चुरडा झाला.