नवी दिल्ली: विविध परिस्थितीत मी 2032 पर्यंत लढू शकते. कारण माझ्यात अजून बरीच कुस्ती शिल्लक आहे, अशी भावना भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट हिने पत्राद्वारे व्यक्त केली. पॅरिस ऑलिम्पिकमधून निलंबन झाल्यानंतर आणि सीएएसनं याचिका फेटाळल्यानंतर विनेश फोगाटची रौप्य पदकाची आशा संपली. अंतिम फेरी खेळू न शकल्यानं विनेश फोगाटनं सोशल मीडिया पोस्ट करत निवृत्ती जाहीर केली होती. आज तिनं एक पोस्ट करुन तिच्या या वाटचालीत साथ देणाऱ्यांचे आभार मानले आहेत. तसेच कुस्तीत पुनरागमन करण्याचे संकेत देखील विनेश फोगाटने दिले आहेत. मात्र विनेश फोगाटच्या या पत्रावरुन तिची बहीण गीता फोगाट हिने निशाणा साधला आहे.
गीता फोगाटचा (Geeta Phogat) पती पवन सरोहा म्हणाला की, विनेश तू खूप छान लिहिले आहेस, पण कदाचित आज तुम्ही तुमचे काका महावीर फोगाट यांना विसरलात. महावीर फोगाट यांनीच तुम्हाला कुस्ती शिकवली होती. देव तुला सुद्धबुद्धी देवो, असं पवन सरोहा म्हणाला. पवन सरोहाची हिची पोस्ट गीता फोगाटने रिट्विट केली आहे. त्यामुळे विनेश फोगाटने (Vinesh Phogat) लिहिलेल्या तीन पानांच्या पत्रात काका महावीर फोगाट यांचं नावाचा उल्लेख न केल्याने गीता फोगाटही नाराज असल्याचं दिसून येत आहे.
विनेश फोगाट पत्रात नेमकं काय म्हणाली?
विनेश फोगाटनं लहान खेड्यातील मुलगी असल्यानं ऑलिम्पिक काय असतं हे माहिती नव्हतं. लहान मुलगी असताना लांब केस असावेत असं स्वप्न असतं. मोठं झाल्यानंतर प्रत्येक तरुणीचं हातात मोबाईल असणं याशिवाय इतर गोष्टी करणं असं स्वप्न असतं. माझे वडील बस चालक होते, ते म्हणायचे, माझ्या मुलीनं विमानातून प्रवास करावा त्यावेळी मी रस्त्यावर गाडी चालवत असावं. माझ्या वडिलांचं स्वप्न मी सत्यात उतरवलं. सर्वात लहान असल्यानं वडिलांची लाडकी होते, असं विनेशनं म्हटलं. आईनं तिच्या मुलींनी तिनं जे आयुष्य जगलं त्याच्या पेक्षा चांगलं आयुष्य जगण्यासाठी संघर्ष केला, असंही विनेश म्हणाली. वडिलांच्या निधनानंतर तीन महिन्यातच आईला कॅन्सर झाल्याचा उल्लेख विनेशनं केला आहे.आईनं केलेला संघर्ष, कधीच हार मानायची नाही ही वृत्ती, लढाऊ बाणा यामुळं मी घडले, असं ती म्हणाली. जे तुझं असेल त्यासाठी संघर्ष करं हे आईनं शिकवलं. जेव्हा धाडस करायचं असतं तेव्हा आईच्या धाडसीपणाचा विचार करते, असं विनेश फोगाटनं म्हटलं.
प्रशिक्षक काय म्हणाले?
पॅरिस ऑलिम्पिकमधील विनेश फोगाटचे प्रशिक्षक हंगेरीचे वोलर अकोस यांनी, 50 किलो वजन गट कुस्तीच्या फायनलच्या आदल्या रात्री साडेपाच तास वजन कमी करता करता त्या रात्री विनेशचा जीव जातो की काय, अशी भीती वाटत होती, या शब्दात आपबीती सांगितली. अकोस यांनी फेसबुक पोस्ट करत विनेश फोगाट वजन कमी करीत असताना काय संघर्ष करीत होती याबद्दल सर्व काही खुलासा केले, पण नंतर त्यांनी ती पोस्ट डिलीटदेखील केली.
संबंधित बातमी: