पॅरिस : वाढत्या उष्णतेची तमा न बाळगता भारताची स्टार नेमबाज मनू भाकरने ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी केली आहे. तिने तिसऱ्यांदा पदक मिळवण्याचा पूर्ण ताकदीने प्रयत्न केला. पण यात तिला यश आले नाही. मनू भाकर 25 मीटर प्रकारात आणखी एक पदक घेऊन येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. पण तिला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
पात्रता फेरीत गाठले होते दुसरे स्थान
यायाधी तिने 10 मीटर एअर पिस्तूल नेमबाजीच्या वैयक्तिक आणि मिश्र सांघिक गटात कांस्यपदकाची कमाई केली आहे. मनूला तिसऱ्या 25 मीटर प्रकारात यश आले नसले तरी तिने कमवलेल्या दोन पदकांमुळे भारताची मान उंचावली आहे. याआधी मनू भाकरने 25 मीटर नेमबाजी प्रकारात लक्ष्याचा अचूक वेध घेत पात्रता फेरीत दमदार कामगिरी केली होती. तिने पात्रता फेरीत दुसरा क्रमांक पटकावून थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता.
चौथ्या क्रमांकावर मानावे लागले समाधान
दोन पदकं जिंकून मनू भाकरने याआधीच इतिहास रचला आहे. आज झालेल्या लढतीत ती भारतासाठी तिसरं पदक जिंकून हॅटट्रिकचा नवा इतिहास रचेल अशी आशा व्यक्त केली जात होती. पण 25 मीटर नेमबाजीत तिला थोडक्यात पराभव स्वीकारावा लागला. तिला चौथ्या स्थानावर समाधान मानवे लागले.
पदकाची हॅटट्रिक हुकल्यानंतर मनू काय म्हणाली?
पदकाची संधी थोडक्यात हुकल्यानंतर मनू भाकरने प्रतिक्रिया दिली आहे. अंतिम सामन्यात मी थोडी निराश झाले होते. मी माझे संपूर्ण देण्याचा प्रयत्न केला, पण यावेळी हवं तसं घडलं नाही. लक्ष विचलित होऊ नये म्हणून मी सोशल मीडियापासून स्वत:ला दूर ठेवलं होतं, असं मनूने सांगितलं.
दक्षिण कोरियाला मिळाले सुवर्णपदक
25 मीटर नेमबाजी प्रकारात दक्षिण कोरियाच्या जिन यांगने सुवर्णपदक पटकावले. तर फ्रान्सच्या कॅमिली जेड्रेझेजेविस्कने रौप्यपदक पटकावले. गंहेरीची वेरोनिका मेजर हिला कांस्यपदक मिळाले.
मनू भाकरचे केले जातेय अभिनंदन
दरम्यान, 25 मीटर नेमबाजी प्रकारात मनू भाकरला पदक पटकावता आले नसले तरी तिच्या या आधीच्या कामगिरीमुळे संपूर्ण भारतात आनंदोत्सव साजरा केला गेला. तिने कमवलेल्या दोन पदकांमुळे भारताची उंची वाढलेली आहे. तिने केलेल्या या कामगिरीमुळे तिचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
हेही वाचा :