मुंबई : भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनीचे भारतातच नव्हे तर जगभरात लाखो चाहते आहेत. धोनीने भारताला वर्ल्डकप जिंकून दिलेला आहे. त्यामुळेच तो अख्ख्या भारताचा हिरो आहे. दरम्यान, सध्या याच महेंद्रसिंह धोनीचा एक फोटो सगळीकडे चर्चेचा विषय ठरलाय. या फोटोत धोनी एका पोलीस अधिकाऱ्याच्या बाजूला उभा असल्याचं दिसतंय. 


धोनीच्या फोटोची सगळीकडे चर्चा


महेंद्रसिंह धोनीचा एक फोटो सध्या सगळीकडे व्हायरल होत आहे. या फोटोत धोनी एका पोलीस अधिकाऱ्याशी गप्पा मारताना दिसतोय. या फोटोमुळे धोनीसोबतचा तो अधिकारी कोण आहे, असे विचारले जात आहे. या फोटोमध्ये धोनी कॅज्यूअल लूकमध्ये दिसतोय. त्याने टी-शर्ट आणि जिन्स परिधान केली आहे. तर त्याच्या बाजूला अभी असलेली व्यक्ती पोलीस युनिफॉर्ममध्ये दिसतोय. विशेष म्हणजे त्याने थ्री स्टार युनफॉर्म परिधान केलाय. दोघेही एकमेकांशी मनमोकळेपणाने गप्पा मारताना दिसतायत. 






फोटोतील तो अधिकारी कोण आहे?


धोनीच्या या फोटोमुळे त्याच्या बाजूला अभ्या असलेल्या अधिकाऱ्याची चर्चा होत आहे. हा पोलीस अधिकारी दुसरा-तिसरा कोणी नसून एक प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू आहे. या माजी क्रिकेटपटूचे नाव जोगिंदर शर्मा असे आहे. त्याने भारताला 2007 सालचा विश्वचषक जिंकून दिला होता. भारताला विश्वचषक जिंकून देणाऱ्या धोनीच्या टीममध्ये जोगिंदर शर्मा यांचादेखील समावेश होता. विशेष म्हणजे विजय कठीण असताना जोगिंदर यांनीच मोलाची कामगिरी केली होती. 


2007 सालच्या सामन्यात काय घडलं होतं?


जोगिंदर शर्मा यांनी 2007 सालच्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात शेवटचे षटक टाकले होते. शर्मा हे वेगवान गोलंदाज आहेत. धोनीने विश्वास टाकून शेवटचे षटक टाकण्यासाठी शर्मा यांच्याकडे चेंडू सोपवला होता. या सामन्यात पाकिस्तानला शेवटच्या सहा चेंडूंमध्ये 12 धावा हव्या होत्या. शेवटच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर मिसबाह उल हकने षटकार लगावला होता. मात्र दर्जेदार कामगिरी करून जोगिंदर शर्मा यांनी भारताल पाच धावांनी विजय मिळवून दिला होता. 






जोगिंदर शर्मा सध्या डीएसपी 


दरम्यान, धोनी आणि जोगिंदर शर्मा यांची तब्बल 12 वर्षांनी भेट झाली आहे. या भेटीचा फोटो शर्मा यांनी आपल्या इन्स्टाग्राम खात्यावर पोस्ट केला आहे. तब्बल 12 वर्षांनी धोनीला भेटून खूप छान वाटले, अशी भावना जोगिंदर यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी फेब्रुवारी 2023 मध्ये क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून निवृत्ती जाहीर केली होती. जोगिंदर शर्मा सध्या हरियाणा पोलिसात डीएसपी या पदावर कार्यरत आहेत.


हेही वाचा :


"आयपीएल वाला रुल है क्या!" 'तो' व्हिडीओ समोर आल्याने केएल राहुल ट्रोल, पण त्याने असा प्रश्न नेमका का केला?


तो बाद नव्हता तरी सोडलं मैदान, जनिथ लियानगेच्या निर्णयामुळे श्रीलंकचे सगळेच खेळाडू चकित; नेमकं काय घडलं?


Video : तिनं गोल्ड मेडल जिंकलं अन् सहकाऱ्याने थेट लग्नाची मागणी घातली, ऑलिम्पिकच्या मैदानात जुळले सात जन्माचे नाते!