Tokyo Olympics 2021 : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताकडून मेरी कोम आणि मनप्रीत सिंहला ध्वजवाहकाचा मान देण्यात आला आहे. टोकियो ऑलिम्पिक 23 जुलैपासून सुरु होत आहे. तर समारोप आठ ऑगस्ट रोजी होणार आहे. भारताकडून विश्वविजेती बॉक्सिंग चॅम्पियन मेरी कोम आणि पुरुष हॉकी टीमचा कर्णधार मनप्रीत सिंह उद्घाटन समारोहामध्ये ध्वजवाहक असतील तर समारोप कार्यक्रमाला कुस्तीपटू बजरंग पुनिया ध्वजवाहक असणार आहे. इंडियन ऑलिम्पिक असोशिएशननं ही माहिती दिली आहे.






असं पहिल्यांदाच झालं आहे की, ऑलिम्पिकमध्ये भारताकडून दोन ध्वजवाहक असतील. या घोषणेनंतर मेरी कोमनं म्हटलं आहे की, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. कारण खेळाडू म्हणून ही माझी शेवटची ऑलिम्पिक स्पर्धा आहे. माझ्यासाठी हे खूप भावनात्मक क्षण असणार आहे. तिनं म्हटलं की, उद्घाटन समारोहामध्ये संघाचं प्रतिनिधित्व करायला मिळणं ही माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. यासाठी माझ्या निवडीबद्दल मी क्रीडा मंत्रालय आणि इंडियन ऑलिम्पिक असोशिएशन यांची आभारी आहे. मी पदक मिळवण्यासाठी सर्वश्रेष्ठ योगदान देईन, असं मेरी कोमनं म्हटलं आहे.