नवी दिल्ली : ज्युनियर कुस्तीपटू सागर धनकड खून प्रकरणातील आरोपी ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमारने आता तिहार जेल प्रशासनाला आपल्या सेलमध्ये टीव्ही बसविण्याची मागणी केली आहे. सुशील कुमारने तिहार कारागृह प्रशासनाला लिहलेल्या निवेदनात म्हटलंय की त्याला ठेवण्यात आलेल्या कोठडीत तो एकमेव कैदी असल्याने मला एकटं वाटतंय, त्यामुळे मला टीव्हीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी, जेणेकरून कुस्ती खेळात काय चाललंय याची माहिती मिळेल.


सुशील कुमारने अर्ज दिल्याची डीजी यांची माहिती
तिहार जेलचे डीजी संदीप गोयल म्हणाले, की जेल कारागृह प्रशासनाला सुशील कुमारकडून अर्ज आला असून त्यात त्याने टीव्ही लावण्याची मागणी केली आहे.


सुरक्षेसाठी सुशील कुमारला हाय सिक्योरिटी तुरूंगात ठेवलंय
कारागृह प्रशासनाचे म्हणणे आहे की सुशील कुमार दोन नंबरच्या तुरूंगात बंद आहे. सुरक्षेच्या कारणामुळे त्याला हाय सिक्योरिटी तुरूंगात ठेवण्यात आले आहे. हेच कारण आहे की सुशीलला ज्या कक्षात ठेवले आहे तिथे इतर कोणत्याही कैद्याला ठेवण्यात आले नाही. सुशील कुमार यांच्या अर्जावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.


मंडोली कारागृहात असताना अतिरिक्त प्रोटीन आहाराची मागणी
जेल प्रशासनाकडून पैलवान सुशील कुमारची ही पहिली मागणी नाही. यापूर्वी सुशील कुमारने अटकेनंतर मंडोली तुरुंगात पाठविण्यात आले होते. तेव्हा सुशील कुमारने आपल्या कुस्तीचे कारण देत हाय प्रोटीन आहार घेण्याची मागणी केली होती. जेल कारागृह प्रशासनाने याला नकार दिला होता.


4 ते 5 मे दरम्यान रात्री सागरची छत्रसाल स्टेडियममध्ये हत्या
कुस्तीपटू सुशील कुमारने आपल्या अनेक साथीदारांसह 4 आणि 5 मे दरम्यान मध्यरात्री छत्रसाल स्टेडियमध्ये ज्युनियर कुस्तीपटू सागर धनखड आणि त्याचा साथीदार सोनू महल या दोघांना मारहाण केली होती. या हल्ल्यात सागर धनकड ठार झाला.


उत्तर रेल्वेकडून सुशील कुमारला सेवेतून निलंबित


दिल्लीतील छत्रसाल स्टेडियमवर कुस्तीपटू सागर धनकड याच्या हत्येप्रकरणी ऑलिम्पिक विजेता सुशील कुमारला अटक झाली आहे. या कारवाईनंतर उत्तर रेल्वेने सुशील कुमारला सेवेतून निलंबित केले आहे. पुढील आदेश येईपर्यंत त्याच्या निलंबनाचा आदेश अबाधित राहील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. सुशील कुमारला अनेक पदोन्नतीनंतर उत्तर रेल्वे येथे डेप्युटी चीफ कमर्शियल ऑफिसर म्हणून नियुक्त केले होते. सागर धनकड हत्या प्रकरणात प्रथम दिल्ली सरकारने पत्र लिहून सुशीलच्या अटकेविषयी रेल्वेला कळवले होते. यानंतर रेल्वे बोर्डाने उत्तर रेल्वेला पत्र लिहिले. यानंतर सुशीलला निलंबित करण्यात आले आहे.