पॅरिस : भारतानं (Team India) सरपंच हरमनप्रीत सिंग (Harmanpreet Singh) याच्या नेतृत्त्वात पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक  जिंकलं आहे. हरमनप्रीत सिंगनं कांस्य पदकाच्या लढतीत दोन गोल केले अन् कांस्य पदक (Team India Won Bronze Medal) मिळवलं. भारतानं कांस्य पदकाच्या लढतीत स्पेनला 2-1 नं पराभूत केलं. भारताचा कॅप्टन हरमनप्रीत सिंगनं केलेल्या दोन गोलमुळं कांस्य पदकावर नाव कोरलं गेलं. हरमनप्रीत सिंगला जागतिक हॉकीमधील सर्वोत्कृष्ट ड्रॅग फ्लिकर मानलं जातं. 


हरमनप्रीत सिंगची धमाकेदार कामगिरी


भारताचा कॅप्टन हरमनप्रीत सिंगनं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 8 मॅचमध्ये 10 गोल केले.  भारतासाठी हरमनप्रीत उपांत्यपूर्व फेरीत, उपांत्य फेरीत  आणि कांस्य पदकाच्या लढतीत गोल करत संघाला विजय मिळवून दिला. हरमनप्रीत सिंह हा पंजाबमधील अमृतसरच्या जंडियाला भागातील तिम्मोवाल गावातील शेतकरी कुटुंबातील आहे. हरमनप्रीत सिंग लहानपणी शाळेतून सुट्टी घेतल्यानंतर तो वडिलांना शेतीच्या कामात मदत करायचा.हरमप्रीत सिंगनं वयाच्या 10 व्या वर्षी हॉकी खेळण्यास सुरुवात केलीहोती. 15 व्या वर्षी त्यानं अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला होता.  हरमनप्रीत सिंगला 2015 मध्ये भारताच्या वरिष्ठ हॉकी संघात संधी मिळाली होती.  


आम्हाला पाठिंबा द्या, प्रेम द्या, दमदार कामगिरी करु : हरमनप्रीत सिंग


हरमनप्रीत सिंगनं भारतीय संघाची सुवर्णपदक जिंकण्याचं ध्येय डोळ्यासमोर बांधणी केली होती. भारतानं या ऑलिम्पिकमध्ये ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाला पराभूत केलं. हरमनप्रीत सिंग मैदानावर खेळत असताना ज्या संयमानं खेळतो तेव्हा महेंद्रसिंह धोनी पेक्षा अधिक संयमी असतो.  विराट कोहली ज्या प्रमाणं क्रिकेटच्या ग्राऊंडवर आक्रमक असतो तसाच  किंवा त्यापेक्षा अधिक आक्रमकपणा हरमनप्रीत सिंग ज्यावेळी पेनल्टी कॉर्नरवर गोल करतो त्यावेळी पाहायला मिळतं. हरमनप्रीत सिंग ज्यावेळी फॉर्ममध्ये असतो त्यावेळी तो रोहित शर्मापेक्षा अधिक खतरनाक विरोधी संघांसाठी असतो.  


मॅच जिंकल्यानंतर हरमनप्रीत सिंगनं आम्ही हे पदक जिंकलं याचा आनंद आहे, असं म्हटलं.  पीआर श्रीजेश यांचं हॉकीतील करिअर जेवढ्या वर्षांचं आहे त्या वयाचे काही खेळाडू आहेत. श्रीजेशची निवृत्ती आमच्यासाठी हा विशेष क्षण होता, आम्हाला कांस्य पदक मिळालं ही आनंदाची बाब आहे, असंही हरमनप्रीत सिंगनं म्हटलं. 


टोकियो ऑलिम्पिक असो किंवा पॅरिस ऑलिम्पिक असो, पदक पदक असतं, दोन्ही पदकं महत्त्वाची असतात. आम्ही कोणत्याही संघाला पराभूत करु शकतो हे दाखवून दिलं आहे. एकमेकांवर विश्वास ठेवला आणि हे करुन दाखवलं, असं हरमप्रीत सिंग म्हणाला. 


भारतीय हॉकीचा इतिहास मोठा आहे, आम्ही देशासाठी आणखी पदक घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय, आम्हाला पाठिंबा द्या, प्रेम द्या, आम्ही पुढच्या काळात चांगली कामगिरी करु, असं हरमनप्रीतनं म्हटलं. 



पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतानं कांस्य पदक जिंकलं आहे. भारतानं 52 वर्षानंतर सलग दुसरं कांस्य जिंकलं आहे.  भारतानं ऑलिम्पिकमध्ये चौथ्यांदा कांस्य पदक मिळवलं आहे.भारतीय हॉकी संघाला आतापर्यंत ऑलिम्पिकमध्ये 13 पदकं मिळाली आहेत. त्यामध्ये आठ सुवर्ण पदक, एक रौप्य आणि चार कांस्य पदकांचा समावेश आहे. 


संबंधित बातम्या :


Video : द ग्रेट इंडियन 'वॉल'... पदक जिंकलं, गोलपोस्टसमोर नतमस्तक, श्रीजेशची निवृत्ती; टीम इंडियासाठी भावूक क्षण


मोठी बातमी : भारताच्या हॉकी संघाची कमाल, 'सरपंच' हरमनप्रीतची धमाल, ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक