Bajrang Punia News : हरियाणा विधानसभा निवडणुकीपूर्वी देशातील स्टार कुस्तीपटू आणि किसान काँग्रेसचा कार्याध्यक्ष बजरंग पुनियाला जीवे मारण्याच्या धमकी आली आहे. त्याला एका परदेशी नंबरवरून व्हॉट्सॲपवर मेसेज आला. खरं तर, शुक्रवारीच कुस्तीपटू बजरंग पुनिया याने काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्याच दिवशी त्यांना किसान काँग्रेसचे कार्याध्यक्षही बनवण्यात आले. त्यानंतर दोनच दिवसांनी बजरंग पुनियाला जीवे मारण्याची धमकी आली आहे.
काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर बजरंग यांना एका परदेशी क्रमांकावरून व्हॉट्सॲपवर मेसेज आला, त्यात लिहिले होते, "बजरंग, काँग्रेस सोड नाहीतर तुझ आणि तुझ्या कुटुंबाचे काही भले होणार नाही. हा आमचा शेवटचा मेसेज आहे." या धमकीबाबत बजरंग पुनिया यांनी सोनीपतमधील बहलगढ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहेत.
पोलिसांचे म्हणणे आहे की ते हे प्रकरण गांभीर्याने घेत असून धमकी देणाऱ्या व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जात आहेत. या धमकीनंतर बजरंग पुनियाच्या सुरक्षेकडे लक्ष दिले जात असून त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात येत आहे. आणि त्याच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी विशेष बंदोबस्त ठेवला आहे.
पुनिया यांनी शुक्रवारी काँग्रेसमध्ये केला प्रवेश
विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया या कुस्तीपटूंनी शुक्रवारी राजकीय मैदानात उतरून काँग्रेसशी हातमिळवणी केली. काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी विनेश आणि बजरंगला पक्षाचे सदस्यत्व दिले. काँग्रेसमध्ये प्रवेश करताच पक्षाने बजरंग पुनियावर मोठी जबाबदारी सोपवली आहे.
काँग्रेसने बजरंग पुनियाला शेतकरी सेलचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष केले आहे. काँग्रेसने जारी केलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे की, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बजरंग पुनियाची अखिल भारतीय किसान काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्याच्या प्रस्तावाला तत्काळ प्रभावाने मान्यता दिली आहे.
हे ही वाचा -