India vs New Zealand T20 World Cup 2022: टी-20 विश्वचषकातील बिगुल वाजलं असून या स्पर्धेतील पात्रता फेरीच्या सामन्यांसह सराव सामनेही खेळवले जातायेत. या स्पर्धेतील पहिल्या सराव सामन्यात भारतीय संघानं यजमान ऑस्ट्रेलियाचा 6 धावांनी पराभव केला. त्यानंतर भारतीय संघ आज न्यूझीलंडशी दुसरा आणि अखेरचा सराव सामना खेळणार आहे.  भारतीय संघ या स्पर्धतील त्यांचा पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी खेळेल. हा सामना 23 ऑक्टोबर रोजी मेलबर्न क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. 


भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सराव सामना आज दुपारी 1.30 वाजता सुरु होणार आहे. या सामन्यात टीम इंडियाच्या काही खेळाडूंवर विशेष नजर असेल. केएल राहुल आणि सूर्यकुमार यादव यांनी गेल्या सामन्यात उत्कृष्ट कामगिरी केलीय. या सामन्यात अर्धशतकं झळकावून भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.न्यूझीलंडविरुद्ध सराव सामन्यात सर्वांच्या नजरा माजी कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिकसह अनेक खेळाडूंवर असतील.


मोहम्मद शामी, भुवनेश्वर कुमारकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा
वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या दुखापतीमुळं भारतीय संघ अडचणीत सापडलाय. परंतु, ऑस्ट्रेलियाविरुद्ध सराव सामन्यात मोहम्मद शामी आणि भुवनेश्वर कुमार दमदार प्रदर्शन केलं. यांसह भारताचा युवा वेगवान गोलंदाज अर्शदीपकडूनही चांगल्या कामगिरीची अपेक्षा केली जातेय. तर, हर्षल पटेल आणि हार्दीक पांड्या यांच्या कामगिरीवरही सर्वांचं विशेष लक्ष असेल. 


भारताचा ऑस्ट्रलियावर 6 धावांनी विजय
टी-20 विश्वचषक 2022 स्पर्धेत भारताची सुरुवात गोड झाली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळण्यात आलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतानं 6 धावांनी विजय मिळवला. ब्रिस्बेनच्या गब्बा येथे खेळण्यात आलेल्या सराव सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या भारतानं केएल राहुल, सूर्यकुमारच्या अर्धशतकीय खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियासमोर 20 षटकात सात विकेट्स गमावून 187 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा संघ 20 षटकात 180 धावांपर्यंत मजल मारू शकला.


भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, ऋषभ पंत, दीपक हुड्डा. 


हे देखील वाचा-