Novak Djokovic : सर्बियाचा स्टार टेनिस खेळाडू नोवाक जोकोविचने इटालियन खुली टेनिस 2022 स्पर्धा जिंकली आहे. सहा महिन्यानंतर जोकोविचने एखाद्या चषकावर नाव कोरलेय. रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात जोकोविचने स्टेफानोस सितसिपासला 6-0, 7-6 अशा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला. यासह जोकोविचने सहाव्यांदा इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेवर नाव कोरलेय. या विजयासह जोकोविचने फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत प्रतिस्पर्धी खेळाडूंना इशारा दिलाय. जोकोविचला कोरोना व्हायरस प्रतिबंधक लसीकरण न केल्यामुळे ऑस्ट्रेलियन खुल्यासह मोसमातील अनेक स्पर्धांमधून बाहेर काढण्यात आले होते. त्यानंतर जोकोविचने टेनिस कोर्टावर दणक्यात कामगिरी केली आहे. 


स्टेफानोस सितसिपासचा पराभव करत नोवाकने कारकिर्दितील आपला 1001 वा विजय मिळवला. शनिवारी उपांत्य फेरीत सामना जिंकत जोकोविचने एक हजारावा विजय मिळवला होता. जिमी कॉनर्स (1,274 विजय), रॉजर फेडरर (1,251), इव्हान लेंडल (1,068) आणि राफेल नदाल (1,051) यांच्यानंतर एक हजारपेक्षा जास्त विजय मिळवणारा जोकोविच पाचवा पुरुष खेळाडू ठरलाय.   


जोकोविचला कोरोना प्रतिबंधक लसीकरण न केल्यामुळे ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेसह मोसमातील अनेक स्पर्धांमध्ये खेळण्यास परवानगी दिली नव्हती. त्यामुळे मागील काही दिवसांपासून तो टेनिस कोर्टाबाहेरच होता. पण इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेतून त्यानं दणक्यात पुनरागमन केलेय. या स्पर्धेत जोकोविचने सुरुवातीपासून आपला दबदबा कायम ठेवला होता. उपांत्य फेरीत जोकोविचने जगातील अव्वल क्रमांकाच्या कास्पर रूडचा 6-4,6-3 अशा फरकाने पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली होती.  


इगा स्वियाटेकचा सलग 28 वा विजय, इटालियन खुल्या महिला स्पर्धेवर कोरलं नाव -
 दरम्यान, याआधी इगा स्वियाटेकने महिलांच्या इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत ओन्स जेबुरचा 6-2, 6-2 असा पराभव केला. इगा स्वियाटेकचा हा सलग 28 वा विजय होय. इगा स्वियाटेकने हिने सरेना विलियम्सच्या लागोपाठ 27 विजयाचा विक्रम मोडीत काढला. सेरेनाने 2014 आणि 2015 मध्ये लागोपाठ 27 विजय मिळवले होते. उपांत्य फेरीत इगा स्वियाटेककडून पराभूत झालेली ओन्स जेबुर हिनेही लागोपाठ 11 सामने जिंकले होते. पण 12 व्या सामन्यात तिला पराभवाचा सामना करावा लागला.