कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर क्रीडाविश्व हळूहळू पूर्वपदावर येत आहे. पण या महामारीनंतर अनेक खेळांच्या नियमावलीत बदल झाले आहे. क्रिकेटमध्येही आयसीसीनं जूनमध्ये काही नवे नियम लागू केले होते. त्यातलाच एक नियम होता 'कोविड-19 रिप्लेसमेंट.'


'कोव्हिड-19 रिप्लेसमेंट' याच नियमानुसार न्यूझीलंडचा गोलंदाज बेन लिस्टर एखाद्या सामन्यात कोरोनामुळे बदली खेळाडू म्हणून खेळणारा पहिलाच खेळाडू ठरला आहे. न्यूझीलंडमध्ये सध्या प्लंकेट शील्ड स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत ऑकलंड इलेव्हन संघाच्या माईक चॅपमन या खेळाडूला कोरोनाची लक्षणं दिसून आली. त्यामुळे त्याच्याजागी ऑकलंड संघात बेन लिस्टरचा कोविड-19 रिप्लेसमेंट नियमानुसार बदली खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला.


सामन्यादिवशी सकाळी मार्कची तब्येत चांगली होती. पण सामना सुरु झाल्यानंतर त्याला अस्वस्थ जाणवू लागलं. त्यानंतर चॅपमनला तपासणीसाठी पाठवण्यात आलं. 26 वर्षांच्या चॅपमननं सहा वन डे आणि 24 ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात न्यूझीलंडचं प्रतिनिधीत्व केलं आहे.


कोरोनामुळे आयसीसीचे नवे नियम


1. कोविड-19 रिप्लेसमेंट


कसोटी किंवा प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये खेळताना एखाद्या खेळाडूला कोरोनाची लक्षणं दिसल्यास बदली खेळाडूची व्यवस्था.


2. लाळ किंवा थुंकीला प्रतिबंध


चेंडूला लकाकी आणण्यासाठी याआधी लाळ किंवा थुंकीचा वापर केला जायचा. पण कोरोनामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून खेळाडूला लाळ किंवा थुंकी लावण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत.


3. होम अंपायर्स


क्रिकेट स्पर्धेदरम्यान त्रयस्थ पंचांऐवजी यजमान देशातल्या आयसीसी पॅनेलमधील पंचांना नियुक्त करणे.


4. DRS च्या वापरात वाढ


अचूक निर्णयासाठी तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर व्हावा यासाठी डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम म्हणजेच डीआरएसचा वापर वाढवण्यात आला आहे.