ICC T20 WC 2021: आयसीसी टी-20 विश्वचषक 2021 च्या पहिल्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडनं इंग्लंडला (ENG vs NZ) 5 विकेट्सनं पराभूत केलंय. हा सामना रोमहर्षक ठरला. एकेकाळी या सामन्यावर इंग्लंडचं वर्चस्व दिसत होतं. पंरतु, न्यूझीलंडच्या फलंदाजांनी अखेरच्या 3 षटकात आक्रमक फलंदाजी करीत ऐतिहासिक विजय मिळवला. या सामन्यानंतर माजी क्रिकेटपटू नासिर हुसेन (Nasser Hussain) यांनी इंग्लंडच्या पराभवाचे कारण सांगितलंय. या सामन्यात इंग्लंडकडून डेथ ओव्हर्समध्ये खराब गोलंदाजी पाहायला मिळाली. ज्यामुळं इंग्लंडचं अंतिम सामना खेळण्याचं स्वप्न भंगलंय, असेही त्यांनी म्हटलंय.
नासिर हुसैन काय म्हणाले?
इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेन म्हणाला की, इयॉन मार्गनच्या नेतृत्वाखाली संघानं डेथ ओव्हरमध्ये निराशाजनक कामगिरी केली. हीच गोष्ट 2016 च्या विश्वचषकातही पाहायला मिळाली. इंग्लंडच्या संघानं कालच्या सामन्यात 17 व्या षटकापर्यंत चांगली गोलंदाजी केली. मात्र, क्रिस जॉर्डनच्या एका षटकानं संपूर्ण सामना उलटून गेला. टायमल मिल्सची अनुपस्थिती इंग्लंडसाठी नुकसानदायक ठरली. डेव्हिड विलीसह त्याचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश करता आला असता, असेही त्यांनी म्हटलंय. दरम्यान, जिमी नीशमच्या वादळी खेळीमुळे अखेरच्या 3 षटकात इंग्लंडच्या हातातून सामना निसटून गेला.
इंग्लंडची अखेरच्या 3 षटकांमधील कामगिरी-
इंग्लंडच्या संघानं 20 षटकात 4 विकेट्स गमावून 166 धावा केल्या. परंतु, क्रिस जॉर्डन, आदिल रशीद आणि क्रिस वोक्स यांनी पुढच्या तीन षटकांत अनुक्रमे 23, 14 आणि 20 धावा देत सामना न्यूझीलंडच्या बाजूनं वळवला. परिणामी, न्यूझीलंडच्या संघानं एक षटक राखून इंग्लंडवर विजय मिळवलाय.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
हे देखील वाचा-