NCP will meet ED officials : ड्रग्ज प्रकरणावरून एनसीबीच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस ईडीविरोधातही आक्रमक होणार असल्याचे म्हटले जात आहे. पक्षाचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी तसे संकेत दिले आहेत. भाजपमधील लोकांवर गुन्हे दाखल होऊनही कारवाई का झाली नाही, याचा ईडीला जाब विचारणार असल्याचे नवाब मलिक यांनी म्हटले.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर केंद्र सरकारच्या अखत्यारीत असणाऱ्या केंद्रीय तपास संस्था आणि राज्य सरकारमध्ये संघर्ष निर्माण झाले. केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग करून राज्यातील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप याआधीदेखील सत्ताधारी गोटातून करण्यात आला होता. मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी केलेल्या कारवाईवर प्रश्न उपस्थित करत आरोपांची मालिका सुरू केली होती. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसने ईडीलाबी जाब विचारण्याची तयारी केली आहे.
वक्फ बोर्डाशी संबंधित घोटाळा प्रकरणी ईडीने आज पुण्यात सात ठिकाणी छापे घातले. या छाप्यानंतर नवाब मलिक यांनी स्पष्टीकरण दिले. वक्फ बोर्डातील कामकाजाच पारदर्शीपणा आणण्यासाठी घेतलेल्या निर्णयांची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. आमच्या क्लिन अप अभियानात ईडीचं सहकार्य मिळत आहे, याचे स्वागत आहे. ईडीला सहकार्य करण्याची आमची तयारी आहे. मात्र, बदनामी करण्याचा डाव असल्यास ते चूक आहे. हेतू प्रामाणिक असेल तर आम्ही सहकार्य करु, पण बातम्या पेरून माझी प्रतिमा मलीन करु शकत नाही, असेही नवाब मलिक यांनी म्हटले.
सत्तेचा गैरवापर करुन ईडीच्या माध्यमातून विरोधी पक्षातील लोकांवर कारवाई केली जातेय. मात्र भाजपमधील लोकांवर ईडीचे गुन्हे दाखल होऊनही कारवाई होत नाही. याचा जाब विचारण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे शिष्टमंडळ ईडी कार्यालयात जाणार असल्याचे त्यांनी म्हटले. भाजप नेत्यांवरील कारवाईला गती का देत नाही, ते तपास का थांबवण्यात आले याची माहिती ईडी कार्यालयात जाऊन घेणार आहोत. ज्यांच्यावर तक्रारी आहेत त्यांच्याबाबतची कारवाई गतीमान करा, असे आवाहनही ईडीच्या अधिकाऱ्यांना करणार असल्याचे मलिक यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसने अशा सर्व प्रकरणांची माहिती जमवली असून त्याआधारे ईडीला प्रश्न विचारणार असल्याचे त्यांनी म्हटले.
संबंधित वृत्त:
Nawab Malik: ड्रग्जचा खेळ गुजरातमधून चालवला जातो का? नवाब मलिकांचा सवाल
क्लिनअप अभियान राबवतोय, ईडी घरी आली तर स्वागत करेल : मंत्री नवाब मलिक