Refund of Examination Fee For 10th-12th Board Exam: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून नियोजित असलेली दहावी बारावी बोर्ड परीक्षा 2020-21 ही ऐनवेळी राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव पाहता रद्द करावी लागली होती. मात्र, या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी परीक्षा शुल्क हे आधीच भरलेले होते. त्यामुळे शिक्षण विभागाकडे जमा असलेले हे परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांची परीक्षाच न झाल्याने अंशतः परत केले जाणार आहे. याबाबत बोर्डाकडून अधिकृत परिपत्रक काढण्यात आले असून तशा प्रकारच्या सूचना शाळा आणि महाविद्यालयांना देण्यात आल्या आहेत.
दहावी बोर्ड परीक्षेसाठी साधारणपणे सतरा लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क भरले होते. तर बारावी बोर्ड परीक्षेसाठी साधारणपणे पंधरा लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क बोर्डाकडे भरले होते. आता या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परतावा मिळणार आहे. त्यासाठी माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचा तपशील 12 नोव्हेंबर सकाळी 11 वाजल्यापासून बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी http://feerefund.mh-ssc.ac.in या लिंक वर भरायचा आहे. तर बारावीच्या विद्यार्थ्यांचा तपशील http://feerefund.mh-hsc.ac.in या लिंक वर जाऊन भरायचा आहे.
दहावी बारावी बोर्ड परीक्षा ही जरी त्यावेळी रद्द झाली होती. तरी या परीक्षेचे तयारीचे काम पूर्ण झाले होते. सोबतच प्रश्नपत्रिका सुद्धा छापून तयार होत्या. त्यामुळे मंडळाला यासाठी जमा झालेल्या परीक्षा शुल्कातून खर्च करावा लागला होता. त्यामुळे हा खर्च विचारात घेऊन अंशतः परीक्षा शुल्काचा परतावा हा विद्यार्थ्यांना दिला जाईल. मागील सहा महिन्यांपासून जमा असलेले परीक्षा शुल्काचे कोट्यावधी रुपये शिक्षण विभागाने तातडीने परत करावे अशी मागणी वारंवार केली जात होती. अखेर आता हे परीक्षा शुल्क परत केले जात आहेत.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
हे देखील वाचा-