कोलकाता : टीम इंडियाच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक महेंद्र सिंह धोनीचा आज 36 वा वाढदिवस आहे. धोनीमध्ये 2019 च्या विश्वचषकात खेळण्याची पूर्ण क्षमता आहे, असं त्याचे बालपणीचे प्रशिक्षक चंचल भट्टाचार्य यांनी म्हटलं आहे.
वेस्ट इंडिजविरुद्ध धोनीने खेळलेल्या संथ खेळीवरही चंचल भट्टाचार्य यांनी भाष्य केलं. याच सामन्यात टीम इंडियाला 11 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. धोनीने या सामन्यात कारकीर्दीतीलं सर्वात संथ अर्धशतक नावावर करत 114 चेंडूत 54 धावा केल्या होत्या.
प्रत्येक दिवस हा रविवार नसतो. धोनीसाठी तो दिवस खराब नव्हता. त्याला त्या सामन्यात चांगली कामगिरी करता आली नाही आणि भारताचा पराभव झाला. पण त्याने हा सामना जिंकून दिला असता तर तो सर्वोत्कृष्ट फिनिशर ठरला असता, असं चंचल भट्टाचार्य म्हणाले.
टीम इंडियाला टी-20, वन डे आणि कसोटीमध्येही नंबर वन बनवणारा धोनी योग्य वेळी निवृत्तीचा निर्णय घेईल, असं चंचल भट्टाचार्य यांनी सांगितलं.
धोनी सध्या सर्वात फिट खेळाडू आहे. तो असा खेळाडू आहे, की त्याला वाटेल तेव्हा निवृत्तीचा निर्णय घेऊ शकतो. जसं की त्याने कर्णधारपद सोडण्याचा आणि कसोटीतून निवृत्तीचा निर्णय घेतला होता, असंही चंचल भट्टाचार्य म्हणाले.