बर्लिन : जर्मनीत सुरु असलेल्या जी-20 परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांची भेट झाली. चीनसोबत सध्या असलेल्या तणावपूर्ण वातावरणाच्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्वाची मानली जात आहे.


मोदी आणि शी जिनपिंग यांची भेट महत्वाची कशामुळे?

सध्या सिक्किममध्ये भारत-चीनदरम्यान 220 किमीची सीमा आहे. यातील सर्व भागात शांततेचं वातावरण आहे. पण ज्या भागात चीन आणि भारताची सीमा भूतानला जोडली आहे, त्या भागावरुन उभय देशांमध्ये तणावाची परिस्थिती आहे. भारत-भूतान दरम्यान सिक्किममध्ये 32 किमीची सीमा रेषा आहे. जवळपास 50 वर्षांपूर्वी म्हणजे 1967 मध्ये भारतीय लष्कराने सिक्किममध्ये चीनी सैन्याला धुळ चारली होती. त्यानंतर चीनकडून सिक्किमच्या भागात कधीही घुसखोरी झाली नाही. पण सध्या या तिन्ही देशांचं ट्रायजंक्शन असलेल्या डोकलाममध्ये तणावाची परिस्थिती आहे.

उभय देशांमध्ये अशा प्रकारचं तणावाचं वातावरण असताना मोदी आणि शी जिनपिंग यांची भेट अत्यंत महत्वाची आहे. विशेष म्हणजे डोकलांग प्रश्नावर मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात चर्चा झाल्याचीही सूत्रांची माहिती आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

सूत्रांच्या मते, चीनने जेव्हा चुंबी खोऱ्यात याटुंगमध्ये डोकलाम परिसरात रस्ते बांधणीचं काम हाती घेतलं. त्यावेळी भारतानं त्याचा कडाडून विरोध केला. पण चीननं या विरोधाला वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या. म्हणून या भागावर लक्ष ठेवण्यासाठी भारतानं दोन बंकर उभारले. पण चिनी सैन्यानं भारताचे हे दोन्ही बंकर उद्ध्वस्त केली. त्यानंतर भारतीय लष्कराने आपली ‘रिइनफोर्समेंट’ म्हणजे लष्कराची एक मोठी तुकडी या भागात तैनात केली, त्यानंतर दोन्ही देशातील सैन्यात तणाव वाढला.

चीनचा डाव

युद्धजन्य परिस्थितीत चीनला आपलं सैन्य सीमेवर तैनात करणं सोपं होणार आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत जर चीनचं सैन्य सीमेवर पोहचलं, तर भारताचा ईशान्य भाग गिळंकृत करेल. त्यामुळेच भारतानं चीनच्या रस्ते बांधणीच्या कामाला विरोध केला आहे.

भूतानला गाजर

दुसरीकडे डोकलाम शिवाय चीनच्या वायव्य भागातील 700 किमीच्या हद्दीवरुनही वाद सुरु आहे. पण डोकलाम आणि सिक्किम गिळंकृत करण्यासाठी चीनने भूतानला डोकलामच्या बदल्यात वायव्येकडील भूभाग सोडण्याचं गाजर दाखवलंय. पण भारत-भूतानचे संबंध चांगले असल्यानं भूताननं चीनच्या प्रस्तावाला नकार दिला आहे.

भारत-भूतान संबंध

कारण, एकतर भूतान एक प्रोटेक्टिव्ह (रक्षित) देश असून, त्याच्या रक्षणाची जबाबदारी भारतावर आहे. यासाठी 2007 मध्ये भारत आणि भूतानमध्ये राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भात करार झाला आहे. या करारान्वये, भूतानच्या सैन्याला भारतीय लष्कर प्रशिक्षण देत आहे.

भारताकडून होजांग परिसरात यासाठी प्रशिक्षण केंद्र सुरु केलंय. ‘इंडियन मिलिट्री ट्रेनिंग टीम’ नावाची भारतीय लष्कराची एक तुकडी भूतानच्या लष्कराला प्रशिक्षण देत आहे. पण यावरुनही चीनने भारतावर आगपाखड केली आहे. भूतान सैन्याला प्रशिक्षण देण्याच्या नावाखाली भारतीय लष्कर चीनच्या सीमेवर पेट्रोलिंग करत असल्याचा आरोप चीनकडून होत आहे. पण चीनचे सर्व आरोप भारताने फेटाळून लावले आहेत.

चीनकडून तिबेटमध्ये रेल्वे मार्ग उभारण्याची तयारी

दुसरीकडे चीनकडून तिबेटची राजधानी ल्हासापासून याटूंगपर्यंत रेल्वे मार्ग उभारला जात आहे. त्यामुळे हे रस्ते बांधणीचं काम पूर्ण झाल्यानंतर भारत-चीन आणि भूतानच्या ‘ट्रायजंक्शन’पर्यंत रेल्वे मार्ग उभारुन, भारताला कोंडीत पकडण्याचा चीनचा डाव आहे.

लष्करप्रमुख बिपिन रावत यांचा सिक्किम दौरा

दरम्यान, भारत-चीन लष्करामधील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी सिक्किमचा दौरा केला. यावेळी त्यांनी भारतीय लष्कराच्या फॉरेमेशन हेडक्वॉर्टरमध्ये जवान आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चीनमधील हालचालींवर चर्चा केली. पण भारत-चीन वादानंतर चीनने कैलास मानसरोवर यात्रेतील चीनची हद्द बंद केली आहे. त्यामुळे मानसरोवर यात्रेला निघालेले यात्रेकरुन सिक्किमच्या गंगटोकमध्ये थांबून आहेत.

चीनच्या उलट्याबोंबा

दुसरीकडे, सोमवारी चीनच्या परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्याने पुन्हा एकदा 1959 मध्ये तत्कालिन पंतप्रधान जवाहरलाल नेहरुंनी सिक्किमप्रश्नी लिहलेल्या पत्राचा दाखला देऊन, भारतावर घुसखोरीचा आरोप केला. पण चिनी प्रवक्त्याने या पत्रातील अक्साई चीनवर जे भाष्ट केलं, त्यातील मुख्य विषयालाच बगल दिली होती.

संबंधित बातम्या


… तर भारताला अमेरिकेशी जवळीक महागात पडेल, चीनची धमकी


हिंदी महासागरात चीनच्या कुरापती, युद्धनौका तैनात


ट्रम्प यांना खुश करण्यासाठी भारतीय सैन्यदलाची घुसखोरी, चिनी मीडियाची आगपाखड


भारत-चीन वादाचं नेमकं कारण असलेलं डोकलामचं ‘ए’ टू ‘झेड’