पिंपरी: पिंपरीतील हिंजवडीत आयटी कंपन्यांनी गजबजलेल्या रस्त्यात आज (शुक्रवार) दुपारी चक्क मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. गवारवाडीत राहणाऱ्या परमेश्वर गवारे या ३३ वर्षीय मृत व्यक्तीवर भररस्त्यातच अंत्यसंस्कार विधी पार पाडण्यात आले.


ज्या ठिकाणी आज या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले तिथं काही वर्षांपूर्वी स्मशानभूमी होती. मात्र, आयटी पार्क उभं राहिल्यानंतर शासनानं ही जमीन संपादित करुन तिथं रस्ता तयार केला. त्यानंतर 2007 साली गवारवाडीतील नागरिकांसाठी तिथूनच जवळ एका ठिकाणी 7 गुंठे जागा देण्यात आली. पण तेथील काही नागरिकांनी स्मशानभूमीस विरोध केला. त्यामुळे या जागेत अद्यापर्यंत स्मशानभूमी उभी राहू शकलेली नाही. तर दुसरी स्मशानभूमी ही तब्बल 6 किमी दूर आहे.

गवारवाडीत साधारण 100 घरांची वस्ती आहे. तर त्याच्याच बाजूला तयार झालेल्या सोसायट्यांमध्ये 6000 घरं आहेत. दरम्यान, स्मशानभूमी नसल्यानं गवारवाडीत नागरिकांना आता थेट रस्त्यावरच अंत्यसंस्कार करणं सुरु केलं आहे. येथील नागरिकांनी यासाठी एमआयडीसी, स्थानिक आमदार यांच्याकडे बराच पाठपुरावाही केला पण 10 वर्ष उलटून गेल्यानंतरही कोणतीच पावलं उचलली गेली नाही. म्हणून प्रशासनाचा निषेध करत आज हे पाऊल उचलण्यात आलं. आतापर्यंत 40 ते 45 मृतदेहांवर इथेच अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती समजते आहे. त्यामुळे आतातरी प्रशासन जागं होणार का? असा सवाल येथील नागरिक उपस्थित करत आहेत.