मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी भारतीय संघातील महत्त्वाचे आणि दिग्गज खेळाडू आहेत. सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड, जहीर खान, अनिल कुंबळे, व्हीव्हीए लक्ष्मण अशा दिग्गज खेळाडूंच्या निवृत्तीनंतरही टीम इंडियाला महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहलीने मोठ्या उंचीवर नेलं. या दोन्ही खेळाडूंची मैत्री आणि एकमेकांप्रती असलेला आदर नेहमीच चर्चेचा विषय असतो. दोघांमध्ये वाद असल्याचंही कधीच समोर नाही आलं. मात्र विराट कोहलीने टीम इंडियाकडून खेळावं यासाठी धोनीचा विरोध होता, असा आश्चर्यचकीत करणारा खुलासा माजी निवड समितीचे अध्यक्ष दिलीप वेंगसरकर यांनी केला आहे.


दिलीप वेंगसरकर यांनी सांंगितलं की, 2008 साली अशीही एक वेळी होती की महेंद्रसिंह धोनी युवा खेळाडू विराट कोहलीला टीम इंडियामधून खेळवण्यास उत्सुक नव्हता. त्यावेळी निवड समिती अंडर 23 टीममधून काही खेळाडूंना टीम इंडियामधून खेळण्यास इच्छूक होती. त्याचवेळी भारताच्या अंडर-19 टीमनेही वर्ल्ड कपमध्ये चांगलं प्रदर्शन केलं होतं. अंडर 19 टीमने विराट कोहलीच्या नेतृत्वात वर्ल्ड कप जिंकला होता. आणि विराटचं संपूर्ण विश्वचषकातील प्रदर्शनही चांगलं होतं. त्यामुळे विराट कोहलीचा भारतीय संघात समावेश व्हावा असं निवड समितीला वाटत होतं. मात्र याला धोनीचा विरोध होता.


दिलीप वेंगसरकर यांनी पुढे म्हटलं की, मी आणि निवड समिती युवा खेळाडूंना संधी देण्यासाठी आग्रही होते. मात्र धोनी आणि मुख्य प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांचं म्हणणं होतं की आम्ही विराटला खेळताना पाहिलेलं नाही. त्यामुळे टीम इंडियामध्ये कोणताही बदल करण्यास ते तयार नव्हते. मात्र महेंद्रसिहं धोनी आणि गॅरी कर्स्टन यांचा विरोध असतानाही निवड समिती आपल्या निर्णयावर अडून राहिली आणि अखेर विराटला टीम इंडियामध्ये खेळण्याची संधी मिळाली. त्याच संधीचं सोनं करत विराटने मोठी झेप घेतली आणि आज टीम इंडियांच नेतृत्व करत आहे.