उस्मानाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या 5 एप्रिलला संध्याकाळी 9 वाजता आपआपल्या घरातील लाईट बंद करून 9 मिनिटे दिवे किंवा टॉर्च लावून कोरोना विरोधात लढा देण्यास सांगितले आहे. मात्र, यामुळे 9 मिनिटे एकाच वेळी लाईट बंद केल्यास तांत्रिक बिघाड होऊन संपूर्ण राज्य व देश अंधारात जाण्याचा धोका उद्भवू शकतो. मात्र हा धोका टाळण्यासाठी केंद्र सरकारने प्लॅन आखला आहे. केंद्रीय ऊर्जामंत्र्यांनी पीसीसीआयएल पॉवरग्रीड आणि लोड सांभाळणाऱ्या यंत्रणेसोबत चर्चा केली.


पॉवर सिस्टम ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड (पॉस्को) ने यासंदर्भात एक प्लॅन तयार केला आहे. पाचही प्रादेशिक लोड डिस्पॅच केंद्रे आणि नॅशनल लोड डीस्पॅच सेंटर (एनएलडीसी) सह जेणेकरून ब्लॅकआउट दरम्यान मागणी अचानक कमी झाली तरीही ग्रीडची वारंवारता कायम राखली जाईल. तसेच राज्य सरकारला गरज पडल्यास वीज वेळापत्रक निश्चित करण्यास तयार असल्याचे सांगितले आहे. यासंदर्भात उत्तर प्रदेशचा प्लॅन तयार झाला असल्याचं कळत आहे.

अचानकपणे मागणी कमी झाल्यानंतर काही युनिट्सचे ग्रीड फ्रीक्वेन्सी बंद करण्यासाठी काही उत्पादक युनिट तयार मोडमध्ये ठेवण्यास सांगितले आहे. एनटीपीसीसारख्या मध्यवर्ती सुविधादेखील ग्रीडच्या आवश्यकतेनुसार त्यांचे काही गॅस आधारित स्टेशन चालू केली जाऊ शकतात. ऊर्जा मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार 2 एप्रिल2020 ची देशात सर्वाधिक वीज मागणी 125817 मेगा वॅट आहे. 2 एप्रिल 2019 च्या तुलनेत ही मागणी 20 टक्क्यांनी कमी आहे.

भारताचा ग्रीड एक सिंक्रोनस ग्रीड म्हणून जोडला गेला आहे. जो किमान 50 हर्ट्जवर कार्यरत राहतो. सीईआरसीनुसार वारंवारता बँडची परवानगी श्रेणी 49.95-50.05 हर्ट्ज आहे. केंद्र सरकार राष्ट्रीय आणि प्रादेशिक लोड विभाग केंद्रांद्वारे ग्रीड वारंवारतेचे नियमन करते. स्टेट लोड डीस्पॅच सेंटर (एसएलडीसी) च्या माध्यमातून राज्य इंट्रा-ग्रिड्सचे नियमन करते.

लाईट बंद न करता दिवे लावा - नितीन राऊत
जर देशात एकाचवेळी लाईट बंद केल्यास विजेची मागणी कमी होईल. लॉकडाऊनमुळे आधीच विजेची मागणी घटल्यामुळे जनरेशन आणि पुरवठ्याचे गणित बिघडले आहे. जर सर्वांनी एकाच वेळी लाईट बंद केल्यास अजून परिस्थिती बिघडून जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ग्रीडमध्ये अचानक विजेची मागणी वाढल्यास आणि कमी झाल्यास फ्रिक्वेन्सी फेल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विधानाचा काळजीपूर्वक विचार जनतेने करावा व लाईट बंद न करता फक्त दिवे किंवा मेणबत्ती लावावी असे आवाहन डॉ. राऊत यांनी जनतेला केले आहे.

नऊ मिनिट लाईट बंद केल्यास राज्य अंधारात जाण्याचा धोका : उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत


तर महाराष्ट्र अंधारात
सद्य स्थितीत महाराष्ट्र राज्याची पॉवर डिमांड ही 23 हजार मेगावॅट वरून 13 हजार मेगावॅट आली आहे. लॉकडाऊनमुळे इंडस्ट्री लोड पूर्णतः झिरो झाले आहे. 13 हजार मेगावॅट विजेवर केवळ अत्यावश्यक सेवा आणि घरगुती विजेचा लोड आहे. सर्वांनी अचानक दिवे बंद केल्यास ग्रीड फेल होऊन सर्व पॉवरस्टेशन हायफ्रिक्वेन्सी वर ग्रीड होतील. मोठ्या प्रमाणात पॉवर डिमांड असलेल्या महाराष्ट्रा सारख्या राज्यात वीज फेल्युरमुळे सर्व पॉवर स्टेशन बंद पडल्यास मल्टी स्टेट ग्रीड फेल्युर होईल आणि संपूर्ण देश अंधारात जाईल. यामुळे अत्यावश्यक सेवा, हॉस्पिटल सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. त्यानंतर एक पॉवर स्टेशन सर्व्हिसमध्ये यायला साधारणतः 16 तास लागतात. याप्रमाणे सर्व परिस्थिती साधारण व्हायला एक आठवड्याचा कालावधी लागेल. सर्व युद्धासाठी या देशातील वीज ही सर्वांत महत्त्वाची घटक आहे. त्यामुळे विजेवर नियंत्रण ठेवण्यासाठी आपण आम्हाला सहकार्य करण्याचे आवाहन डॉ. राऊत यांनी जनतेला केले आहे.