मुंबई : 66 व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत महाराष्ट्र संघाचा भारतीय रेल्वेकडून पराभव झाला. महाराष्ट्राला रेल्वेकडून 20-47 ने पराभव स्वीकारावा लागला. भारतीय रेल्वे आणि सेनादलात अंतिम सामना होणार आहे.


गेल्या चार दिवसांपासून रायगड जिल्ह्यातील रोह्यात 66 व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. देशातील 31 मातब्बर संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. उपांत्य फेरीत महाराष्ट्रासह हरियाणा, सेनादल आणि भारतीय रेल्वेने स्थान मिळवलं होतं.

स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी महाराष्ट्र, हरियाणा, सेनादल आणि भारतीय रेल्वेच्या संघांमध्ये उपांत्य फेरी झाली. उपांत्य फेरीत महाराष्ट्राच्या संघाचा भारतीय रेल्वे संघाने धुव्वा उडवला, तर हरियाणाला सेनादलाने पराभवाची धूळ चारली. सेनादलाने 52 गुण मिळवून हरियाणावर 14 गुणांनी मात केली.

उपांत्य फेरीत प्रवेश करताना महाराष्ट्राच्या संघाने बिहारवर 39 -16 अशी मात केली तर हरयाणाने उत्तर प्रदेशच्या संघावर एका गुणाने 49-48 अशी मात करीत उपांत्य फेरी गाठली होती. उपांत्यपूर्व फेरीमध्ये महाराष्ट्राच्या अजिंक्य पवार, रिशांक देवाडिगा, तुषार पाटील आणि विकास काळे यांनी जोरदार कामगिरी केली होती.