नवी दिल्ली : महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक इतिहासात पहिल्यांदाच दिल्लीत झाली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीत अनेक मुद्द्यांवर मंथन होणार असून ज्येष्ठ नेते या कार्यकारिणीला संबोधित करणार आहे. भाजपच्या 'पहला वोट मोदी के नाम' या अभियानाला काँग्रेस 'पहला वोट देश के नाम'च्या माध्यमातून उत्तर देत आहे


राष्ट्रीय पातळीवरच्या नेतृत्वाचा महाराष्ट्रातल्या युवकांशी संवाद व्हावा या हेतूने कार्यकारिणीची बैठक दिल्लीत बोलावल्याची माहिती महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना दिली.

बेरोजगारी हा 2019 मधील निवडणुकीतला सगळ्यात मोठा मुद्दा असेल. कारण शेतकरी आत्महत्यांबाबत, किमान चर्चा होते, पण बेरोजगारीमुळे ज्या युवकांच्या आत्महत्या होत आहेत, त्याकडे फारसं कुणाचं लक्ष नसल्याचं तांबे म्हणाले.

'पहला वोट मोदी के नाम' असं भाजपचं अभियान आहे. पण त्याला उत्तर देण्यासाठी आम्ही त्यांच्या आधीच 'पहला वोट देश के नाम' सुरु केलं असल्याचंही सत्यजीत तांबेंनी सांगितलं. 2019 च्या निवडणुकीचा निर्णय मतदारांनी 2018 मध्येच घेतल्याचं सांगत तांबेंनी काँग्रेसला तीन राज्यांमध्ये मिळालेल्या विजयाकडे लक्ष वेधलं.

प्रियांका गांधींबद्दल भाजपला भीती वाटते म्हणूनच अशा पद्धतीची विधान येत असल्याचा दावाही तांबेंनी केला. शेवटच्या टप्प्यात सरकारने काहीही केलं, तरी त्याचा प्रभाव पडणार नाही, असंही तांबेंना वाटतं.

युवक काँग्रेसला लोकसभा विधानसभेसाठी कोटा मांडलेला नाही. पण ज्या ज्या युवकांची, तरुण नेतृत्वाची निवडून येण्याची क्षमता आहे, त्या सर्वांना संधी मिळाली पाहिजे, असं मत पक्षाच्या विविध व्यासपीठावर मांडल्याचंही तांबे म्हणाले.