Maharashtra Kho Kho Team : महाराष्ट्रात सुरु 55 व्या राष्ट्रीय अजिंक्यपद पुरुष-महिला स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला अशा दोन्ही संघानी विजयी कामगिरी कायम ठेवली आहे. नुकत्याच झालेल्या सामन्यात पुरुषांनी मध्य भारत संघावर तर महिलांनी उत्तर प्रदेशवर विजय मिळवत उपउपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. आता उपउपांत्यपूर्व फेरीत महाराष्ट्र पुरुषांमध्ये गुजरात विरुध्द तर महिलांचा संघ आंध्र प्रदेश विरुध्द मैदानात उतरणार आहे.


आजच्या दिवसाचा विचार करता सकाळच्या सत्रात महिला गटाच्या सामन्यात महाराष्ट्राने आपल्या खेळाची चमक दाखवत उत्तर प्रदेशचा 29-9  असा दणदणीत पराभव केला. नाणेफेक जिंकून आक्रमण करताना प्रियंका इंगळेने 8 गुण मिळवले. अपेक्षा सुतार आणि दिपाली राठोड यांनी प्रत्येकी 3 गुण मिळवताना प्रियंकाला चांगली साथ दिली.  पुजा आणि संपदा मोरे यांनी प्रत्येकी 2 गुण मिळवले. तर रेश्मा राठोड, स्नेहल जाधव, प्रिती काळे यांनी प्रत्येकी 1 गुण मिळवत डावच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. महाराष्ट्राने संरक्षण करताना अपेक्षा सुतारने 2.30 मि. आणि अश्विनी शिंदेने 3.05 मि. संरक्षण करुन निवृत्ती स्विकारली. संपदा मोरे हिने 1.15 मि. संरक्षण तर स्नेहल जाधवने 1.40 मि. नाबाद संरक्षण केले. मध्यांतराला मिळवलेल्या 21-4 अशा आघाडीनंतर महाराष्ट्राने उत्तर प्रदेशला फॉलोऑन देत पुन्हा संरक्षण केले. फॉलोऑन नंतर महाराष्ट्राच्या प्रिती काळेने 2.30 मि. संरक्षण आणि दिपाली राठोड हिने 2.5 मि. संरक्षण करत  निवृत्ती स्विकारली. गौरी शिंदे हिने 1.25 मि. संरक्षण तर रुपाली बडे हिने 1.50 मि. संरक्षण केले आणि एका मोठ्या विजयाला गवसणी घातली.


पुरुषांचाही दमदार विजय


पुरुष गटात महाराष्ट्राने मध्यभारतवर 21-9 अशी एका डावाने बाजी मारली. मध्यभारतने नाणेफेक जिंकून संरक्षण स्विकारले. प्रथम आक्रमणाच्या या डावामध्ये महाराष्ट्राच्या ऋषिकेश मुर्चावडे 4 गुण, लक्ष्मण गवस, निहार दुबळे, सुरज लांडे यांनी प्रत्येकी 3 गुण मिळवले. अनिकेत पोटे, गजानन शेंगाळ यांनी प्रत्येकी 2 गुण मिळवण्यात यश मिळवल. तर अक्षय भांगरे, रामजी कशब, प्रतीक वाईकर यांनी प्रत्येकी 1 गुण मिळवला.  महाराष्ट्राने संरक्षण करताना प्रतीक वाईकर 3 मि. संरक्षण, लक्ष्मण गवस 2.40  मि. संरक्षण,  ऋषिकेश मुर्चावडे 1.30 मि. आणि रामजी कश्यप 1.10 मी  संरक्षण करुन निवृत्ती स्विकारली. मध्यंतराच्या 21.05 अशा  स्थितीनंतर महाराष्ट्राने मध्यभारतवर फॉलोऑन देत पुन्हा संरक्षण केले. त्यावेळी महाराष्ट्राच्या दिलीप खांडवी2.30  मि. संरक्षण, आदित्य गणपुले 2.10 मि. संरक्षण, गजानन शेंगाळ1.50 मि. संरक्षण, अनिकेत पोटे 1.10 मि. संरक्षण आणि अक्षय भांगरे याने 1.20  मि. नाबाद संरक्षण केले.  


 



हे देखील वाचा- 


Fifa World Cup 2022, ARG vs KSA : तगड्या अर्जेंटिना संघाला सौदी अरेबियानं 2-1 नं दिली मात, वाचा पराभवाची प्रमुख तीन कारणं