Aditya Thackeray: युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे बुधवारी एक दिवसाच्या बिहारच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दरम्यान आदित्य ठाकरे बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट घेणार आहेत. त्यांच्यासोबत शिवसेना नेते अनिल देसाई, खासदार प्रियांका चतुर्वेदी उपस्थित राहतील. आदित्य ठाकरे आणि तेजस्वी यादव यांची भेट दुपारी 3 वाजता होणार आहे. पक्षाने याबाबत एक परिपत्रक प्रसिद्ध करून ही माहिती दिली आहे.
महाराष्ट्र महाविकास आघाडीचा प्रयोग करून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने एकत्र येऊन राज्यात सरकार स्थापन केली होती. मात्र शिवसेनेत फूट पडून ठाकरे आणि शिंदे असे दोन गट निर्माण झाले आणि मविआ सरकार कोसळे. याच्याच काही दिवसानंतर बिहारमध्ये नितीश कुमार यांनी भाजपची साथ सोडून आरजेडी सोबत हातमिळवणी केली आणि नवीन सरकार स्थापन झालं. या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असलेले तेजस्वी यादव आणि आदित्य ठाकरे यांची ही भेट मुंबईच्या येत्या महानगरपालिका निवडणुकीवर परिणामकारक ठरू शकते, अशी चर्चा आहे. याच कारण म्हणजे मुंबईत मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीय नागरिक राहतात. मुंबईच्या पालिकेच्या अनेक जागांवर त्यांचं मत हे परिणामकारक ठरू शकतं.
यातच बुधवारी आदित्य ठाकरे यांच्या बिहार दौऱ्यात ते कोण-कोणत्या ठिकाणी भेट देणार आहेत. तसेच त्यांच्या या दौऱ्यामागे नेमकं काय कारण आहे, हे अद्याप कळू शकलेलं नाही. यातच तेजस्वी यादव आणि आदित्य ठाकरे यांच्या भेटीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे, हे देखील अद्याप स्पष्ट झालेलं नाही. तत्पूर्वी शिवसेनेत फूट पडल्यावर आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र दौरा केला होता. यावेळी त्यांनी शिवसेना आता राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होणार, असे संकेत दिले होते. या अनुषंगाने देखील ही भेट महत्वाची मानली जात आहे. दरम्यान, राष्ट्रीय राजकारणात आदित्य ठाकरे सक्रिय होताना दिसत आहेत. अलीकडेच उत्तर प्रदेश आणि गोव्याच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या. या दोन्ही राज्यात भाजपने एकहाती विजय मिळवला आहे. या दोन्ही राज्याच्या निवडणुकीत आदित्य ठाकरे हे स्वतः प्रचारात उतरले होते. उत्तर प्रदेशमध्ये देखील त्यांनी स्वतः सभा घेतली होती.
इतर महत्वाची बातमी: