मुंबई : "दहावीत असताना कुस्ती सुरु केली, पण तीन वेळा मोठ्या शहरातील आखाड्यातून हाकलून लावलं. मात्र तरीही 'वशिला' लावून आखाड्यात प्रवेश मिळवून मेहनत घेतली आणि 'महाराष्ट्र केसरी'ची गदा तिसऱ्यांदा पटकावली", असं विजय चौधरीने सांगितलं.

कुस्तीच्या आखाड्यातील मानाची महाराष्ट्र केसरीची गदा तिसऱ्यांदा पटकवणाऱ्या विजय चौधरीने त्याचा प्रवास आज 'माझा कट्टा'वर उलगडला. विजयसह त्याचे प्रशिक्षक अमोल बुचडे यांनीही 'माझा कट्टा'वर कुस्तीविश्वाची मुशाफिरी घडवून आणली.

मातीतली कुस्ती हे महाराष्ट्राचं वैभव आहे. त्यामुळे मॅटवरच्या पैलवानाला हरवून महाराष्ट्र केसरी पटकावण्याचं ध्येय होतं, ते तिसऱ्यांदा पूर्ण केल्याचं विजयने सांगितलं.

कुस्ती हा महागडा खेळ आहे हे सर्वांनाच माहित आहे, मात्र मातीतली कुस्ती मॅटवरच्या कुस्तीसमोर कशी टिकणार, महाराष्ट्रात अजूनही मातीतील कुस्तीलाच प्राधान्य का? पैलवानांसमोरच्या अडचणी, सरकारकडून अपेक्षा यासारख्या विविध विषयांवर विजय चौधरी आणि अमोल बुचडे यांनी गप्पा मारल्या.



पहाटे चारला उठून 5 किमी रनिंगपासून दिवसाची सुरुवात, ते दांडगा व्यायाम आणि आवश्यक खुराकामुळेच 'महाराष्ट्र केसरी'ची हॅटट्रिक करु शकलो, असं विजय चौधरी म्हणाला.

हरियाणात मुली मोठ्या प्रमाणात कुस्तीकडे वळल्या आहेत, मात्र महाराष्ट्रात तसं चित्र नाही. महाराष्ट्रातील कुस्ती मागे पडण्यासाठी राजकारणीही तितकेच जबाबदार आहे, असं अमोल बुचडे म्हणाले.

पहिलं प्रेम क्रिकेट


लहानपणी कुस्ती  आवडत नव्हती. क्रिकेट हीच पहिली आवड होती. त्यातच बॉलिंग आणि फिल्डिंग जास्त आवडायची. मात्र दहावीनंतर वडिलांनी कुस्तीच्या आखाड्यात उतरवलं आणि महाराष्ट्र केसरीपर्यंतचा प्रवास सुरु झाला, असं विजयने सांगितलं.

पुण्यातून तीनवेळा हाकललं

मूळचा जळगावाचा असलेल्या विजयच्या जिल्ह्यात कुस्तीला पोषक असं वातावरण नव्हतं. मात्र स्थानिक आखाड्यात चांगली कुस्ती खेळत असल्याचं पाहून, वडिलांनी पुण्यातील तालमीत पाठवलं. मात्र कुस्तीची परंपरा नसलेल्या उत्तर महाराष्ट्रातून आल्याने पुण्यातून मला तीन वेळा हाकलून लावलं. पण 'रुस्तम ए हिंद' आणि 'महाराष्ट्र केसरी' अमोल बुचडे यांच्याशी संपर्क साधला आणि पुण्यातील आखाड्यात कुस्तीचा सराव सुरु केला, असं विजय चौधरीने सांगितलं.

दिनक्रम

पुण्यातील आखाड्यात दाखल झाल्यानंतर विजय चौधरी प्रचंड मेहनत घेत होता. सध्याचा विजयचा दिनक्रम पाहता, त्याने तिसऱ्यांदा 'महाराष्ट्र केसरी' कसा मिळवला हे दिसून येईल.

- विजय सकाळी साडेचार वाजता उठतो.

- 5 किमी धावणे

- मग एक हजार सपाटे (बैठका), डंबेल्स मारणे

- मॅटवर प्रॅक्टिस, रस्ता चढणे

- बदामाची थंडाई पिणे

- सोमवार, मंगळवार आणि शनिवार मांसाहार खात नाही, त्या दिवशी नाश्त्याला दलिया खातो

- मग दोन तास विश्रांती

- त्यानंतर सकाळी दहा वाजता मातीच्या आखाड्यात अर्धा तास 12 किलोच्या फावड्याने माती उकरणे.

- सकाळी 11.30 वाजता जेवण. जेवणात तीन चपात्या

- दुपारी 12 ते 3 विश्रांती

- तीन वाजता पकड प्रॅक्टिस, त्यानंतर  पुन्हा 300 सपाटे, माती उकरणे

- मग पुन्हा 1 तास रेस्ट आणि बदामाची थंडाई

- रात्री साडेसात वाजता पुन्हा प्रॅक्टिस

- 12-12 किलोचे डंबेल्स मारणे

- गळ्यात 20 किलोची साखळी, हातात 12-12 किलोचे डंबेल्स घेऊन 25 पायऱ्या, अर्धा तास चढ-उतार करणे

- रात्री 9 ला जेवून झोपणे

- परत रात्री 12 वाजता अलार्म लावून उठून दूध पिऊन झोपणे

असा दिनक्रम विजय चौधरी फॉलो करतो.

आईसारखा काळजी घेणारा गोकूळ

विजयला दिनक्रम फॉलो करण्यासाठी किंबहुना त्याचं दिवसाचं, प्रॅक्टिसचं आणि महत्त्वाचं म्हणजे खुराकाचं सगळं नियोजन त्याचा गोकूळ नावाचा मित्र करतो. कोणत्यावेळी दूध, नाश्त्याला काय आणि जेवण कधी हे सगळं गोकूळ पाहतो. त्यामुळे विजयने जरी तीनवेळा महाराष्ट्र केसरी जिंकली असली, तरी त्यामागे मेहनत घेणारे गोकूळसारखे अनेकजण आहेत.



मोबाईल फोडला

खेळाडूला ध्येय गाठण्यासाठी अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो. मोबाईल ही काळाची गरज असताना, विजयच्या प्रशिक्षकांनी त्याला मोबाईलपासून दूर ठेवलं. विजय चोरुन मोबाईल वापरत असल्याचं जेव्हा प्रशिक्षक रोहित पटेल यांना समजलं, तेव्हा त्यांनी मोबाईल फोडून टाकल्याचं विजयने सांगितलं.

अक्षय कुमार आवडता हिरो

कुस्तीच्या आखाड्यातून मनोरंजनासाठी चोरुन सिनेमे पाहतो. बॉलिवूडपेक्षा हॉलिवूडपट जास्त आवडतात. मात्र अक्षय कुमार हा आपला आवडता हिरो असल्याचं विजयने नमूद केलं. 'अक्षय कुमारला कायमच भेटावसं वाटतं. पण कधी भेटता आलं नाही. बघूयात कधी भेटायला मिळेल.' असंही विजय म्हणाला.

मॅटवरील कुस्ती

महाराष्ट्रात मॅटवरील कुस्तीने तितका वेग घेतलेला नाही. उत्तरेत हरियाणा, दिल्लीने ते स्वीकारल्याने तिकडील मल्ल आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकत आहेत. मात्र त्यांना त्या त्या सरकारचं मोठं पाठबळ मिळत आहे. त्या तुलनेत महाराष्ट्रात मातीतील कुस्तीच लोकप्रिय आहे. इकडे मॅटवरील कुस्तीला तितका लोकाश्रय नाही. त्यामुळे गावोगावच्या जत्रेत कुस्ती खेळून त्या बक्षीसांवर पैलवान आपली गुजराण करत असल्याचं वास्तव अमोल बुचडे यांनी मांडलं.

विजयची गंभीर दुखापत

ऐन बहरात असताना पायाला दोनवेळा गंभीर दुखापत झाल्यामुळे अनेक महिने वाया गेली. चालता येत नव्हतं, तेव्हा पुन्हा कुस्ती खेळू शकेल का हा प्रश्नच होता. मात्र सहा महिन्यात जवळपास 25 किलो वजन घटवून, आराम केला. दुखापत बरी झाल्यानंतर पुन्हा सरावाला सुरुवात केली, असं विजय म्हणाला.

फक्त मैदानात उभा राहिलो आणि कुस्ती जिंकलो

यावेळी विजयने महाराष्ट्र केसरी फायनलच्या कुस्तीची आठवण सांगितली. प्रतिस्पर्धी पैलवान अभिजीत कटकेचा अभ्यास करुन, त्याला त्याचे डावपेच आखूच दिले नाहीत. मैदानात मी उभाच राहिलो आणि मला गुण मिळत गेले, माझा विजय झाला असं विजय चौधरीने सांगितलं.

कानात सुपारी फोडण्याचं रहस्य

बहुतेक पैलवानांचे कान सुपारी सारखे फुगलेले असतात. मात्र त्याचं नेमकं रहस्य काय हे अनेकांना माहित नसतं. त्याबाबतही आज अमोल बुचडे यांनी सांगितलं.

कुस्ती खेळताना झटापटीत कानाला मार लागतो. कुस्तीदरम्यान पैलवानाला त्याची कळ समजून येत नाही. सातत्याने हे झाल्याने सुजलेले कान तसेच राहतात, ते सुपारीसारखे दिसतात. त्यामुळे सुपारीसारख्या कानाचा अपभ्रंश होऊन, पैलवानाच्या कानात सुपारी फोडली जाते, असा समज सर्वत्र असल्याचं बुचडे यांनी सांगितलं.

सुलतानमधून काय शिकला

सध्या 'सुलतान' आणि 'दंगल'सारखे सिनेमे कुस्तीवर आधारित आहेत. सलमान खानचा 'सुलतान' सिनेमा पाहिला. त्या सिनेमात जखमी झाल्यानंतरही खचून जायचं नाही, हे शिकलो असं विजय चौधरी म्हणाला.

पोलिसात नोकरी कधी?

विजय चौधरी दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी झाला त्यावेळीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याला पोलिसांत नोकरी देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र ते आश्वासन अजूनही पूर्ण केलं नाही. त्यामुळे विजयला पोलीस दलात नोकरी कधी मिळणार हा खरा प्रश्न आहे.