Maharashtra Kesari Kusti Competition 2022 : कोरोनामुळे गेले दोन वर्ष जणू काही सारं विश्वच थांबलं होतं. याचा फटका महाराष्ट्र केसरी स्पर्धेलाही बसला होता. तब्बल दोन वर्षांनंतर ही स्पर्धा होत आहे. पण यंदा या स्पर्धेत कोरोना नाहीतर वाढतं तापमान अडसर ठरलं आहे. साताऱ्यातील वाढत्या तापमानामुळे महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील सकाळच्या सत्रातील सामने पुढे ढकलण्यात आले आहेत. हे सर्व सामने संध्याकाळी पाचनंतर घेतले जाणार आहेत.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं यजमानपद यंदा साताऱ्याला मिळालं आहे. येत्या 4 ते 9 एप्रिलदरम्यान साताऱ्यात या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. कोरोना निर्बंध शिथील झाल्यामुळं महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेनं स्पर्धेच्या आयोजनाचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, कोरोना प्रादुर्भावामुळं गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं नव्हतं. अशातच यंदा या स्पर्धेचं आयोजनामुळं राज्यातील कानाकोपऱ्यातील पैलवानांमध्ये उत्साह दिसून येत आहे.
महाराष्ट्रातल्या सर्वाधिक प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं यंदा साताऱ्यात आयोजन करण्यात येणार आहे, याबाबतचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेण्यात आला होता. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या पुण्यात झालेल्या कार्यकारिणीत हा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयानुसार, महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari) किताबासाठीच्या 64व्या राज्य विजेतेपद कुस्ती स्पर्धेचं 4 ते 9 एप्रिल या कालावधीत आयोजन करण्यात येणार आहे. ही स्पर्धा साताऱ्याच्या श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात खेळवण्यात येईल. कोरोनाच्या संकटात गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं नव्हतं. त्यामुळं राज्याच्या कानाकोपऱ्यातल्या पैलवानांना महाराष्ट्र केसरी कुस्तीची यंदा मोठी प्रतीक्षा होती.
दरम्यान, यापूर्वीची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2020 मध्ये पार पडली होती. या स्पर्धेत नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरनं लातूरच्या शैलेश शेळकेवर मात करत मानाची चांदीची गदा उंचावली होती. हर्षवर्धनने शैलेश शेळके याचा 3-2 असा पराभव केला होता.
'महाराष्ट्र केसरी'च्या मानाच्या गदेचा इतिहास
कुस्ती खेळासाठी भरवली जाणारी महाराष्ट्र केसरी ही मानाची स्पर्धा आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेला 1961 साली सुरुवात झाली. सुरुवातीला महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेकडून ही गदा विजेत्या मल्लाला दिली जात होती. कुस्ती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मामासाहेब मोहोळ यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र अशोक मोहोळ यांनी त्यांच्या वडीलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ही चांदीची गदा दरवर्षी देण्याची इच्छा व्यक्त केली. कुस्तीगीर परिषदेकडून त्याला मान्यता देण्यात आली. तेव्हापासून ही परंपरा सुरू आहे. या गदेची लांबी साधारणपणे 27 ते 30 इंच असते, तर व्यास 9 ते 10 इंच असतो. महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं जेतेपद पटकावणारा पैलवान ही गदा उंचावतो. या गदेचं वजन तब्बल 10 ते 12 किलो असतं.
महाराष्ट्र केसरी स्पर्धेची मानाची गदा सागाच्या लाकडापासून तयार केली जाते. त्यावर कोरीव काम करुन गदेवर चांदीच्या पत्र्याचं कोटींग केलं जातं. या गदेच्या मध्यभागी एका बाजुला हनुमानाचं चित्र तर दुसऱ्या बाजुला मामासाहेब मोहोळ यांची प्रतिकृती बसवलेली असते. ही गदा मिळवणं हे महाराष्ट्रातील प्रत्येक मल्लाचं स्वप्न असतं. या गदेसाठी आजपासून साताऱ्यात महाराष्ट्रातील मल्ल झुंजणार आहेत. त्यामुळे यंदा ही मानाची गदा कोण उंचावणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :