Ram Gopal Varma Birthday : राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma) हे चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम निर्माता-दिग्दर्शक आहेत. राम गोपाल वर्माचा जन्म 7 एप्रिल 1962 रोजी हैदराबाद शहरात झाला. त्याने 'शिवा' या तेलुगु चित्रपटातून करिअरला सुरुवात केली. त्यानंतर त्याने पहिला हिंदी चित्रपट बनवला 'रंगीला', जो जबरदस्त हिट ठरला. आमिर खान आणि उर्मिला मातोंडकरच्या या चित्रपटासाठी राम गोपाल वर्माला फिल्मफेअरमध्ये नामांकन मिळाले. रामूला खरी ओळख 1998 मध्ये आलेल्या 'सत्या' चित्रपटातून मिळाली. मनोज बाजपेयी आणि सौरभ शुक्ला यांसारख्या कलाकारांचा हा चित्रपट आजही प्रेक्षकांचा आवडता चित्रपट आहे. या चित्रपटाला फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता.


राम गोपाल वर्माने बॉलिवूडसोबतच साऊथ फिल्म इंडस्ट्रीतही चांगले नाव कमावले आहे. इंडस्ट्रीत अनेक हिट चित्रपट देणारा राम गोपाल वर्मा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिला आहे. एकेकाळी विवाहित असतानाही तो बॉलिवूडच्या एका टॉप अभिनेत्रीला डेट करत होता. ही अभिनेत्री दुसरी कोणी नसून उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) होती. दोघांनी अनेक मोठ्या चित्रपटात एकत्र काम केले होते.


अभिनेत्रीसोबतच्या नात्याची जोरदार चर्चा!


एकेकाळी राम गोपाल वर्मा आणि उर्मिला मातोंडकर यांच्या नात्याची बरीच चर्चा झाली होती. दोघांनी पहिल्यांदा 'सत्या' चित्रपटात एकत्र काम केले होते. यानंतर, राम गोपाल वर्माने उर्मिलासोबत 'रंगीला' हा ब्लॉकबस्टर चित्रपट बनवला. या चित्रपटाने उर्मिलाच्या करिअरला एका वेगळ्याच उंचीवर नेले. हाच चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर उर्मिला आणि राम गोपाल वर्माच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या. प्रसारमाध्यमांमध्ये सुरू झालेल्या या चर्चा चित्रपट निर्मात्याच्या घरापर्यंत पोहोचल्या आणि त्याची पत्नी रत्ना यांना देखील याची माहिती मिळाली.


पत्नीला कळले अन्...


जेव्हा रत्ना यांनी उर्मिला आणि राम गोपाल वर्माच्या अफेअरच्या चर्चा ऐकल्या, तेव्हा त्यांना खूप राग आला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रत्नाने याच कारणावरून उर्मिलाला थप्पड देखील मारली होती आणि राम गोपाल वर्माला घटस्फोटही दिला होता.


अशी सुरु झाली प्रेमकहाणी...


1995 मध्ये 'रंगीला' चित्रपटात काम करताना राम गोपाल वर्मा उर्मिलाच्या प्रेमात पडला होता. इतकेच नाही तर त्याला उर्मिलाचे इतके वेड होते की, तो तिला प्रत्येक चित्रपटात हिरोईन म्हणून घेत असे. 'रंगीला'पूर्वी राम गोपाल वर्माने उर्मिलाला 1992मध्ये तेलगू चित्रपट 'अंतम', ‘द्रोही’ आणि 1993 मध्ये रिलीज झालेल्या 'गायम'मध्ये संधी दिली होती. एक काळ असा होता की, तो फक्त उर्मिलाला त्याच्या चित्रपटात कास्ट करायचा.


केवळ रामूचे चित्रपट अल्यामुळे उर्मिलाने इतर अनेक दिग्दर्शकांसोबत काम करण्यास नकार दिला. राम गोपाल वर्माचं बॉलिवूडमधील अनेक लोकांसोबत जमत नसल्याने, अनेक दिग्दर्शकांनी उर्मिलाला चित्रपटात घेणे बंद केले. हळूहळू उर्मिलालाही चित्रपट मिळणे बंद झाले आणि तिची कारकीर्द उतारावर आली. एकदा राम गोपाल वर्माने उर्मिलाला चित्रपटात घेण्यासाठी माधुरी दीक्षितला चित्रपटातून काढून टाकले होते. नंतर, जेव्हा उर्मिलाला ही गोष्ट समजली, तेव्हा तिने राम गोपाल वर्माचा प्रस्ताव धुडकावून लावला. एवढेच नाही, तर उर्मिलाने रामूसोबत चित्रपट करणेही बंद केले.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha