Kirit Somaiya : भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या (Neil Somaiya) आणि इतर यांच्यावर ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. माजी सैनिक बबन भोसले यांनी रात्री उशिरा ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात ही तक्रार दिली.


काल संध्याकाळी अप्पर पोलीस आयुक्त संजय दराडे यांची भेट


कलम 420, 406, 34 अंतर्गत पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाऊ आमदार सुनील राऊत यांनी भोसले आणि इतर शिवसेना पदाधिकारी यांच्यासह काल संध्याकाळी अप्पर पोलीस आयुक्त संजय दराडे यांची भेट घेतली होती. त्यानंतर भोसले यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. INS विक्रांत ही युद्धनौका वाचवण्यासाठी नागरिकांकडून गोळा केलेल्या निधीत कोट्यवधींचा अपहार केल्याचा आरोप सोमय्या पिता-पुत्रांवर करण्यात आला आहे. माजी सौनिक बबन भोसले यांच्या तक्रारीवरुन ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्या अडचणी वाढणार असल्याचं बोललं जातंय.


संजय राऊतांचा किरीट सोमय्यावर आरोप, आयएनएस विक्रांतसाठी जमा केलेले पैसे राज्यपाल कार्यालयात पोहोचले नाहीत! 


शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप करणारे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर नव्याने आरोप करत 'आएनएस विक्रांत फाइल्स' उघड केली. संजय राऊत यांनी काल पत्रकार परिषदेत म्हटले की, आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी जमा करण्यात आलेला निधी हा राज्यपालांकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याचे सोमय्यांनी म्हटले होते. आरटीआय कार्यकर्ते विरेंद्र उपाध्ये यांनी राज्यपाल कार्यालयाकडून याबाबत ही माहिती मागवली होती. मात्र, राज्यपाल कार्यालयात असा कोणताही निधी मिळाला नसल्याची माहिती राज्यपाल कार्यालयाने दिली असल्याचे राऊत यांनी म्हटले. माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागवण्यात आलेल्या माहितीतून ही बाब समोर आली असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले. हा देशद्रोहीपणा असून त्याचा तपास केंद्रीय संस्थांनी करावा असे आव्हानही राऊत यांनी केले. सोमय्या हे सीए असल्यामुळे असा पैसा कसा पचवायचे याची त्यांनी माहिती असल्याचेही राऊत यांनी म्हटले. या प्रकरणी महाराष्ट्र सरकारने कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. 


राऊतांच्या आरोपावर किरीट सोमय्यांचे प्रत्युत्तर


काल भाजप नेते किरीट सोमय्या बोलताना म्हणाले की, "संजय राऊतांनी आतापर्यंत सतरा आरोप केले. किरीट सोमय्यानं विक्रांतच्या नावाखाली पैसे गोळा करुन अमित शाहांना दिले, त्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यानं निल सोमय्यांच्या पालघरचा भूखंडात कोट्यवधी रुपये गुंतवले, यांसारखे सतरा आरोप केले आहेत. उद्धव ठाकरेंनी दीड महिन्यापूर्वी SIT स्थापन केली. काय निष्पन्न झालं. एकही पुरावा संजय राऊतांनी दिला नाही, असं कोर्टात मुंबई पोलिसांनी स्पष्ट केलं आहे." पुढे बोलताना ते म्हणाले की, "ठाकरे सरकारचे एकापाठोपाठ एक घोटाळे बाहेर येत आहेत. त्यात आता संजय राऊतांचा नंबर आला. त्यामुळे काहीही आरोप करायचे?""संजय राऊत किरीट सोमय्याला देशद्रोही कालपर्यंत दलाल, आणि काय-काय शिवीगाळ करत होते. कितीही अपशब्द वापरले तरी महाराष्ट्रासाठी सगळं काही सहन करेन. त्यांची मनस्थिती समजू शकतो. संजय राऊत आणि त्यांच्या सुजित पाटकर मित्राची चौकशी करावी.", असंही किरीट सोमय्या म्हणाले.