BWF World Badminton Championship : जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये (World Badminton Championship 2022) भारताचा आघाडीचा युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने (Lakshya Sen) विजयी घौडदौड सुरुच ठेवली आहे. त्याने नुकताच स्पेनच्या लुइस पेनलवार (luis penalvar) याला सरळ सेट्समध्ये मात देत थेट प्री-क्वॉटर्समध्ये अर्थात राऊंड ऑफ 16 मध्ये एन्ट्री मिळवली आहे. दुसरीकडे किदम्बी श्रीकांत (Kidambi Srikant) मात्र चीनच्या झाओ जुनपेंगकडून (Zhao Junpeng) पराभूत होत स्पर्धेबाहेर पडला आहे.



लक्ष्यने सामन्यात सुरुवातीपासून अगदी दमदार खेळ दाखवत विजयी मिळवला. केवळ दोन सरळ सेट्समध्ये त्याने हा सामना जिंकला आहे. यावेळी त्याच्या समोर स्पेनच्या लुइस पेनलवारचं आव्हान असताना पहिला सेट काही प्रमाणात अटीतटीचा झाला. पण लक्ष्य सेनने अखेरपर्यंत आपली आघाडी कायम ठेवत 21-12 च्या फरकाने सामना सेट जिंकला. नंतर 1-0 ची आघाडी घेऊन तो दुसरा सेट खेळू लागला. यावेळी पहिल्या सेटपेक्षा अधिक उत्तम कामगिरी करत त्याने 21-10 अशा आणखी मोठ्या फरकाने सेट जिंकत सामनाही जिंकला. लक्ष्य सेनने जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपची विजयी सुरुवात करताना पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत डेन्मार्कच्या हंस-क्रिस्टियन विटिंगसचा (Hans-Kristian Vittinghus) पराभव केला होता. त्याने सामना 21-12, 21-11 अशा फरकाने जिंकला होता. 


किदम्बी श्रीकांत स्पर्धेबाहेर


राऊंड 32 ची मॅच खेळणारा किदम्बी श्रीकांत चीनच्या झाओ जुनपेंगला पराभूत करु न शकल्याने स्पर्धेबाहेर गेला आहे. यावेळी पहिल्या सेटमध्येच चीनच्या झावोने अगदी अप्रितम खेळ दाखवत तब्बल 21-9 अशा मोठ्या फरकाने विजय मिळवला. दुसऱ्या सेटमध्ये किदम्बीने चांगली झुंज दिली पण फरक जास्त असल्यामुळे अखेर श्रीकांत 17-21 अशा फरकाने पराभूत झाला.


महिला दुहेरीतही पराभव


दुसरीकडे त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद या महिला दुहेरीच्या जोडीलाही पराभव पत्करावा लागला. त्यांना मलेशियाच्या पर्ली टॅन (Pearly tan) थिनाह मुरलीधरन (thinaah muralitharan) या जोडीने 8-21 आणि 17-21 च्या फरकाने पराभूत केलं.  


हे देखील वाचा-