मुंबई: महाराष्ट्राचा पैलवान नरसिंग यादव रिओ ऑलिम्पिकला जाणार की नाही याबाबतचा निकाल आज हाती येईल. उत्तेजक सेवन चाचणीत दोषी सापडल्यानंतर नरसिंग यादवनं त्याच्या खाण्यात काहीतरी मिसळण्यात आल्याचा आरोप केला होता. या सर्व प्रकरणी आज निकाल हाती येईल. पण कुस्तीच्या आखाड्यातच नाही, तर आखाड्याबाहेरुनही डावपेच करुन पैलवानांना लोळवलं जातं. पाहूयात याच विषयावर एबीपी माझाचा स्पेशल रिपोर्ट मल्लयुद्ध
नरसिंगला हरवण्यासाठी आखाड्याबाहेर डावपेच?
उत्तेजक सेवन प्रकरणात दोषी आढळलेल्या नरसिंग यादवचं आयुष्य एका नाट्यमय वळणावर उभं आहे. लास वेगासच्या जागतिक विजेतेपद कुस्ती स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई करून नरसिंग यादवनं रिओ ऑलिम्पिकचा कोटा तर मिळवला, पण तोच नरसिंग यादव रिओ ऑलिम्पिकला जाणार की नाही, याचा निर्णय आता नाडा करणार आहे. नरसिंगचा आरोप आहे की, त्याच्या खाण्यात उत्तेजक मिसळून त्याला फसवण्यात आलं आहे. या वादग्रस्त प्रकरणातलं सत्य अजूनही उघडकीस आलेलं नाही, पण एक गोष्ट नक्की खरी आहे ती म्हणजे कुस्तीचे डावपेच हे तिच्या आखाड्यातच नाही, तर आखाड्याबाहेरही सुरू असतात. आणि नरसिंगला हरवण्यासाठी आखाड्याबाहेरच्या डावापेचांचा वापर करण्यात आला का, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे.
नरसिंग यादव उत्तेजक चाचणीत दोषी असल्याची बातमी आली त्याच दिवशी खरं तर तो पुरता ढासळून गेला होता. त्यानं त्याच वेळी एबीपी न्यूजला सांगितलं होतं की, आता ऑलिम्पिकला जाण्याची संधीच हुकली तर तो कुस्ती सोडण्याच्या विचारात आहे.
नरसिंग यादवच्या आरोपांवर विश्वास ठेवला तर जाणवतं की, आखाड्यातल्या प्रत्येक डावाला उत्तर असणारा हा पैलवान आखाड्याबाहेरच्या डावपेचांच्या जाळ्यात अडकला.
आखाड्याबाहेरच्या डावपेचांचा इतिहास
आखाड्यातल्या या खेळात आखाड्याबाहेरून डाव लावला जाण्याचं हे काही पहिलंच उदाहरण नाही. भगवान श्रीकृष्णानं आखाड्याच्या बाहेर उभं राहूनच एक गवताची काडी मोडून भीमाला डाव शिकवला होता. आणि मग आखाड्यात भीमानं जरासंधाचे दोन तुकडे करून ते वेगवेगळ्या बाजूंना टाकले होते. रामायणातही वालीला सुग्रीवाशी कुस्ती लढण्यात गुंतवून, प्रभू रामचंद्रानं त्याचा वध केला होता.
तिसरी कहाणी बायबलमधला महान योद्धा सॅमसन आणि त्याची विश्वासघातकी प्रेयसी डिलिला यांची. सॅमसनच्या भुजांमध्ये इतकं बळ होतं की, त्याच्या शत्रूंची त्याच्यासमोर उभं राहण्याचीही हिंमत होत नव्हती. पण तोच सॅमसन त्याच्या प्रेयसीनं टाकलेल्या डावात असा काय चीत झाला की, प्रेमात हरलेल्या वीरांच्या यादीत त्याचं नाव टॉपला आहे.
WWE ते सुमो रेसलर, सगळीकडेच गोलमाल
आखाड्यातल्या कुस्तीत आखाड्याबाहेरच्या डावपेचांची कहाणी रामायण, महाभारत आणि बायबलच्या काळापासून सुरू झालेली दिसते. त्याची परंपरा आजच्या जमान्यातही सुरू आहे. पण रामायणात रामानं आणि महाभारतात श्रीकृष्णानं आखाड्याच्या बाहेरूनच लावलेल्या डावाचं उद्दिष्ट चांगलं होतं. पवित्र होतं. पण आजच्या जमान्यातले डावपेच म्हणजे तोबा, तोबा. तुम्हीआम्ही डोक्यावर घेतलेल्या डब्ल्यूडब्ल्यूईत तर कुस्तीच्या नावावर उघड उघड नूरा कुस्ती खेळली जाते.
गोलमाल, प्रत्येक आखाड्यात गोलमाल. डब्ल्यूडब्ल्यूईच्या कुस्तीतच नाही, तर जपानच्या सुमा रेसलिंगपासून तुर्कीच्या ऑईल रेसलिंगपर्यंत सगळीकडे गोलमाल. प्रत्येक ठिकाणी आखाड्यातल्या डावपेचाला आखाड्याच्या बाहेरून खेळण्यात आले डावपेच भारी पडतो.
आखाड्यातल्या या गोलमाल घटनांवर विस्तारानं चर्चा करण्याआधी एक नजर कुस्ती किंवा मल्लयुद्धावर.
कुस्तीचे प्रकार
कुस्ती म्हणजे मल्लयुद्ध हे प्रामुख्यानं चार प्रकारचं असतं. भीमसेनी मल्लयुद्ध, हनुमंती मल्लयुद्ध. जांबुवंती मल्लयुद्ध आणि जरासंधी मल्लयुद्ध
भीमसेनी मल्लयुद्ध
भीमसेनी मल्लयुद्ध हे नाव महाभारतातलं महाशक्तीवान कॅरेक्टर आणि पाच पांडवांमधला दुसऱ्या क्रमांकाचा भाऊ भीमावरून पडलं आहे. या प्रकारातल्या कुस्तीत प्रामुख्यानं ताकदीचा वापर करून समोरच्याला दिवसा तारे दाखवण्यात येतात.
हनुमंती मल्लयुद्ध
हनुमंती मल्लयुद्ध हे नाव हनुमानावरून प्रचलित झालं आहे. वानरांसारखी चपळाई हे या प्रकाराच्या कुस्तीचं वैशिष्ट्य आहे.
जाबुंवती कुस्ती
जाबुंवती कुस्तीत डावपेच आणि ताकदीपेक्षा हातापायाच्या कौशल्यावर भर देण्यात येतो.
जरासंधी मल्लयुद्ध
जरासंधी मल्लयुद्ध हे नाव महाभारतातल्या जरासंधावरून घेण्यात आलं आहे. या प्रकारात हातपाय तोडून प्रतिस्पर्ध्याचे हाल केले जातात. ही कुस्ती आजच्या जमान्यात नामशेष झाली आहे.
मल्लयुद्धाच्या म्हणजे कुस्तीच्या या चारही प्रकारात व्यायामाला आणि सरावाला विशेष महत्त्व असतं. म्हणूनच पैलवान मंडळी व्यायामात आणि कुस्तीच्या आखाड्यात तासनतास घाम गाळताना दिसतात.
पण तासनतास घाम गाळल्यानंतरही मग कुस्तीच्या आखाड्यात नियम का तोडले जातात? प्रतिस्पर्ध्याला रोखण्यासाठी नैतिकता का गुंडाळून ठेवली जाते?
सुशीलकुमारवर कान चावल्याचा आरोप
नरसिंग यादवच्या उत्तेजक सेवन प्रकरणात सुशीलकुमार दोषी नसेलही, पण याच सुशीलकुमारवर लंडन ऑलिम्पिकमध्ये आपल्या प्रतिस्पर्धी पैलवानाचा कान चावल्याचा आरोप होता.
प्रतिस्पर्धी पैलवानाचा कान चावल्याच्या आरोपावर बचाव करताना सुशीलकुमारनं आपण शाकाहारी असल्याचा दावा केला होता. आपण शाकाहारी असल्यानं प्रतिस्पर्ध्याचा कान चावणं शक्य नसल्याचं म्हटलं होतं.
आता नरसिंग यादवच्या उत्तेजक सेवन प्रकरणात सुशीलकुमार पुन्हा वादात अडकला आहे. ज्या अल्पवयीन पैलवानावर नरसिंगच्या जेवणात काहीतरी मिसळल्याचा आरोप आहे, त्याचं नातं सुशीलकुमारशी जोडण्यात येत आहे.
नरसिंग यादव आणि सुशीलकुमारच्या वादात सत्य काय आहे, ते अजूनही समोर आलेलं नाही. पण भारताच्या दोन मोठ्या पैलवानांमधला हा वाद कुस्तीच्या इतिहासात एक कलंकित अध्याय जोडला गेला आहे.