मुंबई : झी मराठीवर लवकरच नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'पसंत आहे मुलगी' ही मालिका निरोप घेणार असल्याचं कळतं.

 

'पसंत आहे मुलगी'ची जागा आता 'माझ्या नवऱ्याची बायको' ही सीरियल दिसणार आहे. 22 ऑगस्टपासून सोमवार ते शनिवार रात्री आठ वाजता ही मालिका ऑनएअर होईल.



रेशम प्रशांत आणि अभिषेक देशमुख यांची प्रमुख भूमिका असलेली 'पसंत आहे मुलगी'  मालिका 25 जानेवारी 2016 रोजी पहिल्यांदा प्रसारित झाली होती. पुरोगामी विचारांच्या कुटुंबातील मुलगी आणि कर्मकांड मानणाऱ्या कुटुंबातील मुलगा एकमेकांच्या प्रेमात पडतात. दोघांची मनं जुळली, पण पत्रिका जुळण्याची गरज खरंच उरते का? पत्रिकेतील ग्रह एखाद्याच्या नात्याचं भविष्य ठरवू शकतात का? या प्रश्नांवरच आधारित 'पसंत आहे मुलगी' मालिका आहे.

 

सुरुवातीला प्रेक्षकांच्या मनावर पकड घेण्यास मालिकेला यश आलं नव्हतं. आता कुठे मालिकेने पकड बनवली होती, पण आता निर्मात्यांनी मालिकेचा गाशा गुंडाळण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे.