Wimbledon 2022 : टेनिस विश्वातील सर्वात मानाची स्पर्धा म्हटलं तर विम्बल्डन (Wimbledon). प्रत्येक टेनिसपटूचे विम्बल्डनमध्ये खेळण्याचे स्वप्न असते. तर भारतीय खेळाडूंनीही या स्पर्धेत नाव कमवावं असं प्रत्येक भारतीयाला वाटतं, दरम्यान यंदा पार पडलेल्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेत (Wimbledon 2022) 14 वर्षांखालील गटात भारताचं नेतृत्त्व केलं ते कोल्हापूरच्या ऐश्वर्या जाधवने (Aishwarya Jadhav). अत्यंत लहान वयातच एका छोट्या शहरातून आलेल्या ऐश्वर्याने केलेली ही कमाल खरंच वाखाणण्याजोगी आहे, पण ऐश्वर्याचा हा प्रवास दिसतो तितका सोपा नव्हता. भाड्याच्या घरात राहून अपार कष्टाने तिने विम्बल्डन स्पर्धेचं तिकिट मिळवलं. या सर्वानंतर तिच्या आई वडिलांनी ऐश्वर्याचा धगधगता प्रवास कसा होता, हे एबीपी माझाशी बोलताना सांगितलं.


ऐश्वर्याने नुकतंच विम्बल्डन स्पर्धेत 14 वर्षांखालील गटात भारताचं नेतृत्त्व केलं. भाड्याच्या घरात राहून, कोल्हापूरात आलेल्या पूराच्या महासंकटातून सावरुन ऐश्वर्याने केलेली ही कमाल कामगिरी तिच्या वडिलांनी सांगितली. ऐश्वर्याच्या बालपणीच तिच्या शिक्षणासाठी आणि खेळासाठी मूळ गाव सोडून जाधव कुटुंबीय कोल्हापूरला आले. ऐश्वर्या पाच वर्षाची असताना तिला टेनिस खेळाच्या प्रशिक्षणासाठी टाकलं. आधी केवळ फिटनेससाठी तिला या प्रशिक्षणासाठी टाकलं, ज्यानंतर मात्र तिने टेनिसमध्येच करीयर केलं आहे. अशी माहिती ऐश्वर्याचे वडिल दयानंद जाधव यांनी दिली.


'पूरात टेनिसचं साहित्याही गेलं, तरीही जिद्द सोडली नाही'


ऐश्वर्याच्या या कामगिरीबद्दल सांगताना तिच्या आईने ऐश्वर्याने केलेली मेहनत सांगतिली. त्या म्हणाल्या, ''2019 ला कोल्हापूरात महापूर आला होता. त्यावेळी जाधव कुटुंबियाच्या घरात पाणी शिरलं. ज्यात त्यांच घरातील सर्व सामान ज्यामध्ये ऐश्वर्याचं टेनिसचं साहित्याही गेलं. त्यानंतर कोरोनाचं संकटही आलं, पण या सर्वावर मात करुन तिने तिचा खेळ सुरुच ठेवला आणि आज ही कमाल केली आहे.'' यावेळी बोलताना ऐश्वर्याची आई अंजली जाधव यांनी ऐश्वर्याचं कौतुक करणाऱ्या सर्व भारतीयांचे ही आभार मानले.  


 हे देखील वाचा-