Khelo india Games : हरियाणा येथील पंचकुला या ठिकाणी खेलो इंडिया 2022 स्पर्धा (Khelo India Youth Games 2022) सुरु आहे. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी सुरु ठेवली असून कांस्य आणि रौप्य पदकांसह सुवर्ण पदकांना देखील गवसणी घातली आहे. आज देखील टेबल टेनिस, लॉन टेनिस आणि जलतरणमध्ये महाराष्ट्राने सुवर्णपदकावर नाव कोरलं असून मल्लखांब, सायकलिंगमध्येही पदके मिळवली आहेत. बॉक्सिंगमध्येही नऊ जणांनी विविध गटांमध्ये पदकाकडे कूच केली असून तीन सुवर्ण, चार रौप्य आणि पाच कांस्य पदकावर महाराष्ट्राच्या खेळाडूंनी नाव कोरलं आहे.


स्पर्धेत लॉन टेनिसमध्ये महाराष्ट्राच्या आकांक्षा निठुरेने कर्नाटकच्या सुहिथा मयुरीला पराभूत केलं. दुहेरीत वैष्णवी आडकर आणि सुदिप्ता यांना रौप्यपदक मिळालं, त्यांना तामिळनाडूच्या लक्ष्मीप्रभा आणि जननी रमेश यांनी मात दिली. दुहेरीत आकांक्षा निठुरे आणि रूमा गायकैवारीने आणि एकेरीत वैष्णवी आडकरने कांस्य पदक पटकावलं. तर टेबल टेनिसमध्ये मुलींच्या दुहेरीत मुंबईच्या दिया चितळे आणि स्वस्तिका घोष यांनी हरियाणाच्या प्रिथोकी चक्रवर्ती आणि सुहाना सैनी यांना तीन सेटमध्ये मात देत सुवर्णपदक मिळवलं.


जलतरणमध्येही सुवर्ण सूर


जलतरणमध्ये अपेक्षा फर्नांडिसने 200 मीटरमध्ये विक्रमी कामगिरी केली. तिने 2.25.10 अशी विक्रमी वेळ नोंदवली. यापूर्वी किनिषा गुप्ताचा 2.25.80 असा विक्रम होता. 4 बाय 100 मीटर रिलेमध्ये भक्ती वाडकर, अपेक्षा फर्नांडिस, संजिती साहा, आन्या वाला यांचा संघ होता. पलक जोशीने 200 मीटर बॅकस्ट्रोकमध्ये रौप्य (2.27.01), रिषभ दासने 200 मीटर बॅकस्ट्रोकमध्ये कांस्य (2.12) पदक पटकावले. मल्लखांबमध्ये वैयक्तिक प्रकारात प्रणाली मोरेने कांस्य पदक मिळवले.  


हे देखील वाचा-