Football: फुटबॉलसारख्या आंतरराष्ट्रीय पातळीवर मानाचे पान असणाऱ्या खेळामध्ये वंचित मुलांच्या सहभागावर आधारित असणारा नागराज मंजुळे दिग्दर्शित झुंड सिनेमा काही महिन्यांपूर्वी येऊन गेला. या चित्रपटाच्या रील स्टोरीशी साजेशी अशी रिअल लाईफस्टोरी सध्या कल्याणात साकारताना दिसत आहे. केडीएमसी शाळेतील मुलं आणि मुली चक्क फुटबॉलचे मैदान गाजवताना दिसत आहेत.


कल्याण डोंबिवली महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या कला गुणांना ,क्रीडा गुणांना वाव मिळावा या उद्देशाने केडीएमसीतर्फे एक  उपक्रम राबवण्यात येत आहे. ज्याचाच एक भाग म्हणून आज केडीएमसी शाळेतील 25 मुलं आणि 25 मुली असे तब्बल 50 विद्यार्थी आज फुटबॉलचे मैदान गाजवण्यासाठी सज्ज झाले आहेत. कल्याणातील नामांकित एलीट स्पोर्टिंग अकादमीच्या माध्यमातून केडीएमसी शाळेचे हे 50 विद्यार्थी गेल्या तीन महिन्यांपासून समन्वयक शीतल रसलाम, मुख्य प्रशिक्षक लेस्टर पिटर्स, प्रशिक्षक स्लेज स्टॅनली यांच्या माध्यमातून फुटबॉलचे शास्त्रोक्त प्रशिक्षण घेत आहेत. तेदेखील कोणत्याही आर्थिक मोबदल्याशिवाय. आणि महापालिकेने सुरू केलेल्या या स्तुत्य उपक्रमाला आणि या 50 मुलामुलींच्या प्रयत्नांना हळूहळू यश येऊ लागल्याचे दिसत आहे. 


जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी दोन खेळाडूंची निवड
जिल्हा फुटबॉल संघटनेतर्फे पुढच्या महिन्यात होणाऱ्या जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी यांच्यातील मोहम्मद हुसैन आणि सोहेल खान या दोघा खेळाडूंची निवड झाली आहे. ही केडीएमसी आणि या वंचित मुलांच्या आई वडिलांच्या दृष्टीने अत्यंत अभिमानास्पद अशी बाब आहे. कारण मुख्य प्रवाहापासून दूर असणाऱ्या या वंचित घटकातील मुला मुलींचा की त्यांच्या पालकांचा फुटबॉलशी काडीमात्रही संबंध नाही. या पार्श्वभमीवर हे विद्यार्थी आज फुटबॉलचे आभाळ कवेत घेण्यासाठी सज्ज झाले आहेत.


केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे काय म्हणाले?
महापालिका शाळांमधील मुलांना अशा खेळाचे प्रशिक्षण मिळणे खूप कठीण होते. मात्र या मुलांमध्ये खूप टॅलेंट असून त्यांचे टॅलेंट हंट करून त्यांच्या दोन टीम बनवण्यात आल्या आहेत. या टीमना खेळाचे आवश्यक साहित्य पुरवण्यात येत असून ही मुलं अत्यंत चांगल्या पद्धतीने तयार होत असल्याचे केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी दिली.


क्रीडा प्रकारांसाठीही कल्याण- डोंबिवली महापालिकेचा पुढाकार
फुटबॉलसोबतच खो खो, कबड्डी, कुस्ती, क्रिकेट आदी क्रीडा प्रकारांसाठीही महापालिकेने पुढाकार घेतला असून येत्या काळात होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये हे खेळाडू नक्कीच चमकदार कामगिरी करतील असा विश्वासही आयुक्त डॉ. दांगडे यांनी व्यक्त केला.


हे देखील वाचा-


FIFA U-17 Women’s World Cup: पहिल्याच सामन्यात भारताच्या पदरात निराशा; अमेरिकेविरुद्ध 8-0 नं पराभव


BCCI President: सौरव गांगुलीला बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरून हटवण्यामागं भाजपचा हात; टीएमसीचे गंभीर आरोप