Indian Army Dog : मृत्यूला न घाबरता जो जीवाची बाजी लावत शत्रूशी लढतो. तोच खरा योद्धा असतो..अशीच एक घटना जम्मू काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) घडली आहे. भारतीय लष्करात (Indian Army) अविरतपणे सेवा करणारा तो श्वान म्हणजे 'झूम'(Army Dog Zoom) जम्मू आणि काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात सोमवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराचा श्वान गंभीर जखमी झाला. या चकमकीदरम्यान लष्कर-ए-तोयबाचे दोन दहशतवादी ठार झाले, त्यात 'झूम' श्वानही जखमी झाला. चक्क मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बाहेर येणाऱ्या झूमची शौर्यगाथा जाणून घ्या
झूमला दोन गोळ्या लागल्या
लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, झूम हा प्रशिक्षित, शूर आणि वचनबद्ध श्वान आहे. झूमला दहशतवाद्यांना शोधून त्यांचा खात्मा करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. अधिकार्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, झूमने दहशतवाद्यांच्या अड्ड्यात घुसून दहशतवाद्यांना ओळखले आणि त्यांच्यावर हल्ला केला. प्रत्युत्तरादाखल दहशतवाद्यांनी गोळीबार केला आणि झूमला दोन गोळ्या लागल्या. यादरम्यान झूमला गंभीर दुखापत झाली, परंतु त्याने दहशतवाद्यांशी सामना सुरूच ठेवला. झूमला लष्कराच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात नेण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
'झूम' दहशतवादी लपलेल्या घरात शिरला
भारतीय लष्कराला दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यावर सुरक्षा दलांनी रविवारी रात्री दक्षिण काश्मीरमधील तंगपावा भागात घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली. सोमवारी सकाळी लष्कराने ‘झूम’ नावाच्या श्वानाला दहशतवादी लपलेल्या घरात पाठवले. या कारवाईत दहशतवाद्यांनी झाडलेल्या दोन गोळ्यांमुळे झूम जखमी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. तसेच या चकमकीत दोन जवानही जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गोळीबारात दोन दहशतवादी ठार, श्वान 'झूम' गंभीर जखमी
लष्कराच्या चिनार कॉर्प्सने ट्विट केले, “भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी सुरू केलेल्या संयुक्त ऑपरेशन तंगपावाचा भाग म्हणून अनंतनागमध्ये परिसराची नाकेबंदी करण्यात आली. या गोळीबारात दोन दहशतवादी ठार झाले तर दोन जवान आणि लष्कराचा एक श्वान जखमी झाला. सैनिकांना विमानाने 92 बीएचवर नेण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. दहशतवाद्यांकडून दोन AK रायफलही जप्त करण्यात आल्या आहेत. कारवाईदरम्यान दहशतवाद्यांशी लढताना लष्कराचा हल्ला करणारा श्वान 'झूम' गंभीर जखमी झाला. त्यांच्यावर लष्कराच्या श्रीनगर पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
झूमसाठी पुढील 24-48 तास गंभीर
भारतीय लष्कराच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, शस्त्रक्रियेनंतर आर्मी डॉग झूमची प्रकृती स्थिर आहे. त्याच्या तुटलेल्या मागच्या पायाला प्लास्टर लावले असून त्याच्या चेहऱ्याला झालेल्या जखमांवरही उपचार करण्यात आले आहेत. मात्र डॉक्टरांनी असेही सांगितले, झूमसाठी पुढील 24-48 तास गंभीर आहेत. सध्या तो श्रीनगर येथील लष्कराच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे.
स्निफर डॉग 'एक्सल' ची आठवण
अलीकडेच, जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात लष्कराच्या स्निफर डॉग 'एक्सल'ला दहशतवादविरोधी मोहिमेत मारण्यात आले. यानंतर एक्सेलला यंदाच्या शौर्य पुरस्कारांमध्ये 'मेन्शन-इन-डिस्पॅच' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.