AFC Women's Asian Cup : एएफसी वुमन्स आशिया कप भारत, 2022 या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत जपानने थायलंडचा 7-0 अशा मोठ्या फरकाने मात दिली आहे. नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात जपानने जबरदस्त असा खेळ दाखवत थायलंडला मात दिली आहे. यावेळी जपानने गोलवर गोल करत असताना थायलंडला एकही गोल करु दिली नाही. या शानदार विजयासह दोन वेळच्या विजेत्या आणि गतविजेत्या असलेल्या जपानने आगामी 2023 च्या ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड येथे होणाऱ्या फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी थेट पात्रताही मिळवली आहे.


आता उपांत्य फेरीच्या सामन्यात जपानचा सामना चीन विरुद्ध व्हिएतनाम यांच्यातील विजेत्या संघाविरुद्ध होईल. दुसरीकडे, 1983 सालानंतर पहिल्यांदाच महिला आशिया चषक जिंकण्याचं थायलंडचं स्वप्न मात्र धुळीस मिळालं. पण प्ले ऑफ सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी करुन विश्वचषक स्पधेर्साठी पात्र ठरण्याची संधी मात्र त्यांच्याकडे आहे. कोरोनाचा शिरकाव झाल्याने थायलंडला आपल्या काही खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये जपानविरुद्ध खेळावे लागले. याचा मोठा फटका त्यांना बसला. युइका सुगासवा हिने चार गोल नोंदवत जपानच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. हिनाता मियाझावा, रिन सुमिदा आणि रिको युएकी यांनी प्रत्येकी एक गोल केला.  


असा झाला सामना


सामन्यात सुरुवातीपासून जपानने आक्रमक खेळ करत अल्पावधीतच सामन्यावर पूर्ण नियंत्रण मिळवले. माना इवाबुचीने दोन वेळा आक्रमण केल्यानंतर 14व्या मिनिटाला जपानला आघाडीवर नेण्याची सुवर्ण संधी गमावली. पेनल्टी बॉक्समध्ये थायलंडच्या विलैपोर्न बूथडुआंग हिने रिन सुमिदाला पाडून फाऊल केल्याने जपानला पेनल्टी किक बहाल करण्यात आली. यावेळी मानाने मारलेली किक थायलंडची गोलकीपर वारापोर्न बून्सिंगने अचूकपणे रोखत जपानला आघाडी घेण्यापासून दूर ठेवले.


यानंतरही बून्सिंगने अडखळत का होईना, पण जपानचे आक्रमण रोखले आणि 27 व्या मिनिटाला तिने जपानला गोल करु दिले नाही. मात्र, 27व्या मिनिटाला युइका सुगासवाने गोलजळ्याच्या बरोबर समोरुन जोरदार किक मारत जपानला 1-0 गोल असे आघाडीवर नेले. थायलंडने यानंतर कडवा प्रतिकार करत पुन्हा एकदा भक्कम बचाव केला. मात्र मध्यंतराच्या काही सेकंद आधी हिनाता मियाझावानेही गोलजाळ्याच्या जवळून अचूक किक करत जपानची आघाडी 2-0 गोल अशी भक्कम केली.


दुसऱ्या सत्राचा खेळ सुरु झाल्यानंतर तिसऱ्याच मिनिटाला सुमिदाने जपानचा तिसरा गोल नोंदवत थायलंडच्या स्वप्नांना सुरुंग लावला. तिसरा गोल स्विकाराल्यानंतर थायलंडने काहीसे सावरत असतानाच जपानने मात्र आपला खेळ आणखी वेगवान करताना सामन्यावर पूर्ण नियंत्रण मिळवले. थायलंडकडून काहीसा धुसमुसळा खेळही झाला. फोनफिरुन फिलावनने सुगासवाला खाली पाडल्याने जपानला आणखी एक पेनल्टी किक मिळाली. या संधीचा फायदा घेत सुगासवा हिने वैयक्तिक दुसरा आणि संघाचा चौथा गोल केला. जपानचा वेग झाला नाही. उर्वरीत वेळेत जपानने आणखी 3 गोल केले आणि अखेर 7-0 च्या फरकाने जपानने विजय मिळवत सामना खिशात घातला.


हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha