Ishan Kishan : टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. मात्र, या मालिकेसाठी यष्टिरक्षक फलंदाज इशान किशनची निवड करण्यात आलेली नाही. यापूर्वी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर सुद्धा इशान किशनला संधी मिळाली नव्हती. मात्र, इशान किशनबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. सर्वात मोठा प्रश्न म्हणजे इशान किशन पुन्हा टीम इंडियासाठी खेळू शकणार का? इशान किशन ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेत शेवटचा खेळला होता, मात्र तेव्हापासून तो मैदानावर दिसलेला नाही.






टीम इंडियापासून का दूर आहे इशान किशन?


इशान किशन रणजी ट्रॉफीमध्येही खेळलेला नाही. आता इशान किशनला इंग्लंड मालिकेसाठी टीम इंडियाचा भाग बनवण्यात आले नाही. सोशल मीडियावर ईशान किशनबद्दल अनेक गोष्टी सुरू आहेत. खराब शिस्तीची किंमत इशान किशनला चुकवावी लागल्याचा दावा केला जात आहे. मात्र अलीकडेच भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी अशा गोष्टींमध्ये तथ्य नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. याशिवाय, इशान किशनला आंतरराष्ट्रीय क्रिकेटऐवजी फ्रँचायझी क्रिकेटला अधिक महत्त्व द्यायचे आहे, असा दावाही सोशल मीडियावर केला जात होता.






ईशानच्या वागण्यावर बीसीसीआय खूश नाही!


बीसीसीआय ईशान किशनच्या वागण्यावर नाराज असल्याचे बोलले जात आहे. याची किंमत यष्टिरक्षक फलंदाजाला चुकवावी लागत आहे. द टेलिग्राफच्या वृत्तानुसार, इशान किशनसाठी परिस्थिती सोपी नाही. या खेळाडूला दीर्घकाळ टीम इंडियाच्या बाहेर राहावे लागू शकते. इशान किशन आयपीएल 2024 च्या हंगामात खेळणार हे जवळपास निश्चित झाले आहे, परंतु हा यष्टीरक्षक फलंदाज टी-20 विश्वचषक संघाचा भाग बनू शकेल का? हा प्रश्न अजूनही कायम आहे, पण इशान किशनसाठी पुनरागमनाचा मार्ग सोपा होणार नाही हे निश्चित.


इतर महत्वाच्या बातम्या