IPL 2023 Orange Cap, Yashasvi Jaiswal Runs: आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये 21 वर्षांच्या यशस्वी जायस्वाल (Yashasvi Jaiswal) यानं बड्या-बड्या दिग्गज खेळाडूंना मागे टाकत ऑरेंज कॅपच्या शर्यतीत स्थान मिळवलं आहे. ऑरेंज कॅपपासून यशस्वी आता केवळ एक पाऊल दूर आहे. यशस्वी जायस्वालनं आयपीएल 2023 च्या 12 सामन्यांमध्ये 52.27च्या सरासरीनं आणि 52.27 च्या स्ट्राईक रेटनं 575 धावा केल्या आहेत. यादरम्यान यशस्वीनं 75 चौकार आणि 26 षटकार लगावले आहेत. 


कोलकात्याविरुद्ध 13 चेंडूत अर्धशतक झळकावलं


गुरुवारी, 11 मे रोजी यशस्वी जायस्वालनं आपल्या स्फोटक खेळीनं अनेक दिग्गजांनाही आपली दखल घ्यायला भाग पाडलं. यशस्वीची ही धमाकेदार खेळी पाहून विराटही हैराण झाला. केकेआरविरुद्ध 21 वर्षीय यशस्वीनं अवघ्या 13 चेंडूत अर्धशतक झळकावलं. आयपीएलमधील हे सर्वात वेगवान अर्धशतक ठरलं.




फाफ डू प्लेसिसकडे ऑरेंज कॅप 


सध्या ऑरेंज कॅप रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसकडे आहे. 576 धावांसह सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत डू प्लेसिस पहिल्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे, यशस्वी त्याच्या केवळ एका धावेनं मागे असून तो यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिसऱ्या क्रमांकावर असलेला शुभमन गिल या दोन्ही फलंदाजांच्या मागे आहे. त्याच्या नावावर आतापर्यंत 469 धावा आहेत.


यशस्वी जायस्वाल ऑरेंज कॅपपासून एक पाऊल दूर 


आरसीबीचा कर्णधार फाफकडे अजूनही ऑरेंज कॅप आहे, पण यशस्वी आणि फाफ डू प्लेसिसच्या धावांमध्ये केवळ एकाच धावेचं अंतर आहे. मात्र, बंगळुरूचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचू शकला नाही, तर फाफ डू प्लेसिसला आता केवळ तीन सामने खेळायचे आहेत. दुसरीकडे, यशस्वी चा संघ राजस्थान प्लेऑफमध्ये पोहोचेल, असं बोललं जात आहे. अशा स्थितीत त्याला फाफपेक्षा जास्त सामने खेळण्याची संधी मिळेल. यामुळे यशस्वी यंदाच्या मोसमात ऑरेंज कॅप जिंकण्याचा प्रबळ दावेदार आहे. 


यशस्वी जायस्वालनं या मोसमात झळकावलं शतक 


आयपीएल 2023 मध्ये आतापर्यंत फक्त तीन फलंदाजांनी शतकी खेळी केली आहे. यात यशस्वी जायस्वाल यांच्या नावाचाही समावेश आहे. यशस्वीनं मुंबई इंडियन्सविरुद्ध 124 धावांची धडाकेबाज खेळी केली. त्याचवेळी यशस्वीनं केकेआरविरुद्ध नाबाद 98 धावांची खेळी केली. यशस्वी व्यतिरिक्त वेंकटेश अय्यर आणि हॅरी ब्रूक यांनी या मोसमात शतकी खेळी केली आहे.