IPL 2024 : आयपीएल 2024 हार्दिक पांड्यासाठी चांगलं राहिलं नाही. त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. आयपीएल स्पर्धेची सुरुवात होण्याआधी हार्दिक पांड्याला मुंबईचं कर्णधारपद मिळालं. स्पर्धा सुरु झाल्यानंतर चाहत्यांपासून संघातील खेळाडूंनीही हार्दिक पांड्याला विरोध दर्शवला. प्रत्येक सामन्यावेळी हार्दिक पांड्याला हूटिंग करण्यात येत होतं. सोशल मीडियावरही हार्दिक पांड्यावर जोरदार टीका केली जात होती. त्यातच हार्दिक पांड्या गोलंदाजी आणि फलंदाजीत अपय़शी ठरत होत. टी20 विश्वचषकात त्याला संधी मिळेल की नाही.. याची चर्चा सुरु होती. पण त्याच्यावर बीसीसीआयने विश्वास दाखवला. टी20 विश्वचषकात स्थान मिळताच हार्दिक पांड्या फॉर्मात परतला आहे. त्यानं गोलंदाजीमध्ये शानदार कामगिरी केली. 


गोलंदाजीमध्ये फॉर्मात परतला - 


टी20 विश्वचषकाच्या संघात हार्दिक पांड्याकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले. विश्वचषकाचा संघ घोषित होण्याआधी हार्दिक पांड्याला सात सामन्यात फक्त चार विकेट घेता आल्या होत्या. त्याशिवाय फलंदाजीमध्येही तो फ्लॉप जात होता. पण टीम इंडियातील स्थान निश्चित झाल्यानंतर तो फॉर्मात परतलाय. हार्दिक पांड्याने तीन सामन्यात चार विकेट घेतल्या आहेत. लखनौ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाइट रायडर्सविरोधात हार्दिक पांड्याने प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या होत्या. आज हैदराबादविरोधातही त्यानं शानदार गोलंदाजी केली. हैदराबादविरोधात पांड्याने तीन विकेट घेतल्या.  






हैदराबादविरोधात भेदक मारा - 


वानखेडे मैदानावर हैदराबादविरोधात हार्दिक पांड्याने भेदक मारा केला. त्याची सुरुवात खराब झाली, पण त्यानंतर त्यानं हैदराबादच्या फलंदाजांना तंबूत धाडले. पांड्याने पहिल्या 2 षटकात 22 धावा खर्च केल्या होत्या. पण तिसऱ्या षटकात पांड्याने जोरदार कमबॅक केले. पांड्याने फक्त चार धावा खर्च करत नितीश रेड्डी याचा पत्ता कट केला. त्यानंतर चौथ्या षटकात हार्दिक पांड्याने दोन फलंदाजांना तंबूत धाडले. पांड्याने शाहबाज अहमद आणि मार्को यान्सन यांना बाद केले. हार्दिक पांड्याने चार षटकात 31 धावांच्या मोबदल्यात 3 फलंदाजांना बाद केले. हार्दिक पांड्याने अखेरच्या षटकात फक्त पाच धावा खर्च करत दोन फलंदाजांना बाद केले. हार्दिक पांड्या लयीत आल्याचा फायदा टीम इंडियाला नक्कीच होणार आहे.