Virat Kohli, IPL 2023 : विराट कोहली याने लागोपाठ दुसऱ्या सामन्यात शथकाला गवसणी घातली आहे. हैदराबादविरोधात विराट कोहलीने शतक झळकावले होते. आज मोक्याच्या क्षणी विराट कोहलीने पुन्हा एकदा शतकी खेळी केली आहे. विराट कोहली याने सुरुवातीला संयमी फलंदाजी करत डावाला आकार दिला. त्यानंतर आक्रमक फलंदाजी करत शतकाला गवसणी घातली. विराट कोहलीने 61 चेंडूत नाबाद 101 धावांची खेळी केली. या खेळीत विराट कोहलीने 13 चौकार आणि एक षटकार लगावला. विराट कोहलीच्या शतकी खेळीच्या बळावर आरसीबीने 197 धावांपर्यंत मजल मारली. याने 166 च्या स्ट्राईक रेटने धावांचा पाऊस पाडला.
युनिवर्स बॉसचा विक्रम कोहलीने मोडला -
आयपीएलमध्ये सर्वाधिक शतक झळकावण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर जमा झालाय. विराट कोहलीने आयपीएलमध्ये सात शतके झळकावली आहेत. विराट कोहलीने ख्रिस गेल याचा विक्रम मोडीत काढलाय. युनिवर्स बॉस ख्रिस गेलच्या नावावर सहा शतकांची नोंद आहे. तर जोस बटलर पाच शतकासह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
यंदाच्या हंगामातील नववे तर विराट कोहलीचे दुसरे शतक -
मोक्याच्या सामन्यात विराट कोहलीने शतकी खेळी केली. गुजरातविरोधात विराट कोहलीने शतकाला गवसणी घातली. विराट कोहलीचे यंदाच्या हंगामातील दुसरे शतक झळकावले. तर आयपीएलच्या करिअरमधील विराट कोहलीचे सातवे शतक होय. यंदाच्या हंगामात आतापर्यंत आठ नऊ शतके झळकावण्यात आली आहे. यामध्ये विराट कोहलीच्या बॅटमधून दोन शतके आली आहेत. तर आजच मुंबईच्या अखेरच्या साखळी सामन्यात कॅमरुन ग्रीन याने वादळी शतकी खेळी केली. ग्रीन याने यंदाच्या हंगामातील आपले पहिले शतक झळकावले. यंदाच्या हंगामात इतर फलंदाजांनीही शतके झळकावली आहेत. यामध्ये तीन विदेशी खेळाडूंचा समावेश आहे, दोन्ही खेळाडू हैदराबादचे आहेत. हॅरी ब्रूक, हेनरिक क्लासेन आणि कॅमरुन ग्रीन यांनी शतके झळकावली आहेत. वेंकटेश अय्यर, यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव आणि विराट कोहली... या भारतीय खेळाडूंनी यंदा शतके झळकावली आहेत. एका हंगामात नऊ शतके होण्याची पहिलीच वेळ आहे.
यंदाच्या हंगामात विराट कोहली भन्नाट फॉर्मात -
आयपीएलच्या सोळाव्या हंगामात विराट कोहलीची बॅट धावांचा पाऊस पाडतेय. विराट कोहलीने याने 14 सामन्यात सहाशेपेक्षा जास्त धावा चोपल्या आहेत. यामध्ये दोन शतके आणि सहा अर्धशतकाचा समावेश आहे. 45 ची सरासरी आणि 136 च्या स्ट्राईक रेटने विराट कोहलीने धावांचा पाऊस पाडलाय. विराट कोहली ऑरेंज कॅपच्या स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत आरसीबीचा फाफ डु प्लेसिस पहिल्या क्रमांकवार आहे. डु प्लेसिसच्या नावावर 700 पेक्षा जास्त धावा आहेत.
सर्वच स्तरातून कौतुक -
विराट कोहलीने शतक झळकावल्यानंतर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. स्टेडिअममधील उपस्थित प्रेक्षकांनीही विराटचा जय जयकार केला.. पत्नी अनुष्काने फ्लाईंग किस देत विराटच्या शतकाला दाद दिली. मैदानात असणाऱ्या हार्दिक पांड्याने मिठी मारत विराटच्या शतकाचे कौतुक केले. आरसीबीच्या खेळाडूंनी डगआऊटमध्ये विराट कोहलीच्या शतकाचे सेलिब्रेशन केले. तर समालोचन करणाऱ्या ख्रिस गेल यानेही विराटच्या शतकानंतर स्पेशल कौतुक केले.