कॅमरुनचे वादळ -
201 धावांचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात अतिशय निराशाजनक झाली. सलामी फलंदाज इशान किशन अवघ्या 14 धावांवर बाद झाला. भुवनेश्वर कुमार याने इशानचा डाव संपुष्टात आणला. कर्णधार रोहित शर्मा आणि कॅमरुन ग्रीन यांनी वादळी फलंदाजी केली. या जोडीने हैदराबादच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 128 धावांची भागिदारी केली. रोहित शर्मा याने 37 चेंडूत 56 धावांची खेळी केली. या खेळीत रोहित शर्मा याने आठ चौकार आणि एक षटकार लगावला. कर्णधार बाद झाल्यानंतर कॅमरुन ग्रीन याने डावाची सुत्रे हातात घेतली. कॅमरुन ग्रीन याने हैदराबादच्या गोलंदाजांचा समाचार घेताल. ग्रीन याने 47 चेंडूत शतक झळकावले. या खेळीत त्याने आठ षटकार आणि आठ चौकार लगावले. कॅमरुन ग्रीन याने नाबाद 100 धावांची खेळी केली. सूर्युकमार यादव याने नाबाद 25 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने चार चौकार लगावले.
यंदाचे आठवे शतक -
मुंबईच्या अखेरच्या साखळी सामन्यात कॅमरुन ग्रीन याने वादळी शतकी खेळी केली. ग्रीन याने यंदाच्या हंगामातील आपले पहिले शतक झळकावले. याआधी यंदाच्या हंगामात इतर फलंदाजांनी सात शतके झळकावली आहेत. यामध्ये दोन विदेशी खेळाडूंचा समावेश आहे, दोन्ही खेळाडू हैदराबादचे आहेत. हॅरी ब्रूक आणि हेनरिक क्लासेन यांनी हैदराबादसाठी शतकी खेळी केली. त्यात आता कॅमरुन ग्रीन याची भर पडली आहे. वेंकटेश अय्यर, यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव आणि विराट कोहली... या भारतीय खेळाडूंनी यंदा शतके झळकावली आहेत. एका हंगामात आठ शतके होण्याची पहिलीच वेळ आहे.
मुंबई इंडियन्ससाठी सहावे शतक -
आयपीएलच्या इतिहासात मुंबईसाठी हे सहावे शतक होय. याआधी सूर्यकुमार यादव, एस सिमन्स, रोहित शर्मा, सचिन तेंडुलकर आणि सनथ जयासर्या यांनी मुंबईसाठी शतक झळकावले आहे. यामध्ये चार शतके मुंबईत आलेली आहेत. तर एक मोहाली आणि एक कोलकाता येथे शतक आलेय.
मुंबई प्लेऑफमध्ये पोहचणार का ?
हैदराबादचा पराभव करत मुंबईने प्लेऑफच्या दिशेने आगेकूच केली आहे. आरसीबी आणि गुजरात यांच्यातील सामन्यावर मुंबईचे प्लेऑफचे गणित अवलंबून आहे. बेंगलोरमध्ये सध्या वादळी वाऱ्यासह पाऊस सुरु आहे. त्यामुळे नाणेफेकी उशीराने होणार आहे. हा सामना पावसामुळे रद्द झाला तर मुंबई प्लेऑफमध्ये पोहचेल. मुंबईला प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी गुजरातने सामना जिंकावा लागेल.. अथवा पावसाने हजेरी लावावी लागेल.