Venkatesh Iyer 106 Meter Six : कोलकाता नाइट रायडर्सने शुक्रवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा सात विकेटने दारुण पराभव केला. आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना सहा विकेटच्या मोबदल्यात 182 धावांपर्यंत मजल मारली होती. प्रत्युत्तर दाखल कोलकात्याने हे आव्हान 16.5 षटकात तीन विकेटच्या मोबदल्यात सहज पार केले. कोलकात्याकडून वेंकटेश अय्यर याने शानदार अर्धशतकी खेळी केली. वेंकटेश अय्यरने 30 चेंडूमध्ये 50 धावांची खेळी केली. या वादळी खेळीमध्ये त्याने तीन चौकार आणि चार षटकार ठोकले. व्यंकटेश अय्यर याने आरसीबीविरोधात मारलेला एक षटकार यंदाच्या हंगामातील सर्वात लांब षटकार ठरलाय. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. चेंडू चिन्नस्वामी स्टेडियमच्या बाहेर गेल्याचा दावा काही जणांनी केला आहे.
वेंकटेश अय्यरचा सर्वात लांब षटकार -
वेंकटेश अय्यरने आरसीबीविरोधात चिन्नस्वामी स्टेडियमवर यंदाच्या हंगामातील सर्वात लांब षटकार मारला. आरसीबीच्या मयंक डागर याच्या चेंडूवर वेंकटेश अय्यर याने 106 मीटर लांब षटकार लगावला. हा यंदाच्या हंगामातील सर्वात लांब षटकार होय. याआधी मुंबई इंडियन्सच्या ईशान किशन याने सर्वात लांब षटकार ठोकला होता. ईशान किशनच्या नावावर 103 मीटर लांब षटकाराची नोंद होती. पण आता हा विक्रम वेंकटेश अय्यरच्या नावावर जमा झालाय. आरसीबीसाठी नववे षटक घेऊन आलेल्या मयंक डागर याच्या चौथ्या चेंडूवर वेंकटेश अय्यरने 106 मीटर लांब षटकार मारला. नेटकऱ्यांच्या मते, हा षटकार स्टेडियमच्या बाहेर गेला. याचा व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पाहा व्हिडीओ...
कोलकात्याकडून आरसीबीचा दारुण पराभव -
एम चिन्नस्वामी स्टेडिमवर आरसीबीला कोलकात्याने 7 विकेटने पराभूत केले. कोलकात्यासाठी वेंकटेश अय्यरने सर्वाधिक 50 धावांची खेळी केली. त्याशिवाय कर्णधार श्रेयस अय्यर याने 24 चेंडूमध्ये 39 धावांचे योगदान दिले, यामध्ये दोन चौकार आणि दोन षटकारांचा समावेश आहे. त्याआधी फिलिप सॉल्ट आणि सुनिल नारायण यांनी आरसीबीला आक्रमक सुरुवात करुन दिली. दोघांनी 6.3 षटकात 86 धावांची भागिदारी केली. सॉल्टने 20 चेंडूमध्ये 30 धावा जोडल्या. तर सुनिल नारायण याने 22 चेंडूमध्ये 47 धावांची वादळी खेळी केली. नारायण याने आपल्या वादळी खेळीमध्ये पाच षटकार आणि दोन चौकार लगावले. कोलकात्याने 7 विकेट आणि 19 चेंडू राखून आरसीबीचा पराभव केला. आरसीबीकडून फक्त विराट कोहलीने झुंज दिली. विराट कोहलीने नाबाद 83 धावांची खेळी केली.