CSK vs MI, IPL 2022 : मुंबई इंडियन्सचा युवा फलंदाज तिलक वर्माने यंदाच्या आयपीएल हंगामात सर्वांनाच प्रभावित केले. गुरुवारी चेन्नईविरोधात झालेल्या सामन्यात तिलक वर्माने मॅचविनिंग खेळी केली. तिलक वर्माने नाबाद 34 धावाची खेळी करत मुंबईला विजय मिळवून दिला. या पराभवानंतर चेन्नईचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलेय. मुंबईला एकहाती सामना जिंकून दिल्यानंतर मैदानातच तिलक वर्माने हात जोडले.. याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची चर्चा सुरु झाली आहे..


सामना जिंकल्यानंतर तिलक वर्माने स्टेडिअमवर सामना पाहण्यासाठी आलेल्या आपल्या प्रशिक्षकाला हात जोडले. तिलक वर्माचे लहानपणीचे कोच सलाम बयाश मुंबई आणि चेन्नईचा सामना पाहण्यासाठी आले होते. सामना संपल्यानंतर तिलक वर्माने लहानपणीच्या गुरुला हात जोडून वंदन केले. तिलक वर्माचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय. 






तिलक वर्माची यंदाची कामगिरी - 
मुंबई इंडियन्सचा युवा फलंदाज तिलक वर्मा यंदाच्या आयपीएलमध्ये चमकलेला एक युवा तारा आहे. तिलकने हंगामातील 12 सामन्यात 40.89 च्या सरासरीने आणि 132.85 च्या स्ट्राइक रेटने 368 रन केले आहेत. तो ऑरेंज कॅपच्या शर्यतीतही 7 व्या स्थानावर आहे. तिलकने आयपीएल 2022 मध्ये दोन अर्धशतकं झळकावली असून 61 हा त्याचा सर्वोच्च स्कोर आहे. 


पंतचा विक्रम मोडला -
तिलक वर्माने आतापर्यंत 12 सामन्यात 368 धावांचा पाऊस पाडलाय. तिलक वर्मा आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक धावा काढणारा टीन एजर खेळाडू बनलाय. तिलक वर्माने पाच वर्षापूर्वीचा ऋषभ पंतचा (Rishabh Pant) विक्रम मोडला आहे. 2017 मध्ये दिल्लीकडून खेळताना पंतने 14 सामन्यात 366 धावा केल्या होत्या.  पृथ्वी शॉने  2019 साली 16 सामन्यांत 353 धावा चोपल्या होत्या. या दोन्ही खेळाडूंचा विक्रम तिलक वर्माने मोडला आहे. मुंबईने तिलक वर्माला एक कोटी 70 लाख रुपयांत विकत घेतले होते. यंदाच्या हंगमात मुंबईकडून सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजामध्ये तिलक वर्मा पहिल्या क्रमांकावर आहे. तिलक वर्माने रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन यांनाही मागे टाकलेय.