MI vs GT : मुंबई (Mumbai Indians) विरुद्ध गुजरात (Gujrat Titenes) संघात आज सामना रंगणार आहे. दोन्ही संघात होणारा हा सामना मुंबईच्या होमग्राऊंडवर म्हणजेच वानखेडेच्या मैदानावर खेळला जाणार आहे. हा सामना जिंकला तर गुजरातचा संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करेल. तर मुंबईच्या संघासाठी हा विजय त्यांचा प्लेऑफचा प्रवास आणखी सुखकर करेल. पण हा आयपीएल 2023 च्या पर्वातील असा सामना असणार आहे ज्यामध्ये सात संघ मुंबईच्या पराभवाची प्रार्थना करत आहेत. कारण जर मुंबईने हा सामना जिंकला तर काही संघासाठी प्लेऑफच्या शर्यतीचे दरवाजे बंद होऊन जातील. तर गुजरातच्या विजयाने या संघांना प्लेऑफच्या शर्यतीत राहण्याची संधी मिळेल. त्यामुळे आयपीएलच्या प्लेऑफची शर्यत चांगलीच रोमहर्षक झाल्याचं पाहायला मिळणार आहे.
प्लेऑफची रोमहर्षक शर्यत
मुंबई आणि गुजरातच्या सामन्यादरम्यान पंजाब, बेंगलोर, कोलकाता हैद्राबाद आणि लखनऊचा संघ गुजरातच्या विजयाची प्रार्थना करतील. जर गुजरातचा संघाने हा सामना जिंकला तर या बाकिच्या संघांना प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यास मदत होईल. पण जर रोहित शर्माच्या संघाने बाजी मारली तर मात्र पंजाब किंग्ज, रॉयल चॅलेंजर बैंगलोर, कोलकाता नाईट राइडर्स, सनराईजर्स हैद्राबाद आणि लखनऊच्या संघासाठी प्लेऑफची शर्यत आणखी कठीण होईल.
गुणतालिकेत गुजरात अव्वल
IPL 2023 ची गुणतालिका पाहता गुजरात टायटन्सचा संघ 16 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. हार्दिकच्या संघाला प्लेऑफसाठी पात्र होण्यासाठी फक्त एका विजयाची गरज आहे. आयपीएलच्या 16व्या हंगामात गुजरातने 11 पैकी 8 सामने जिंकले आणि 3 सामन्यामध्ये पराभव स्विकारला. तर मुंबईचा संघ 12 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. रोहित शर्माच्या संघाने या मोसमात 11 पैकी 6 सामने जिंकले आहेत आणि 5 सामन्यांमध्ये पदरी निराशा पाडून घेतली आहे. मुंबईला अजून तीन सामने खेळायचे आहेत. अशा परिस्थितीत मुंबईचा संघ एकही सामना हरला तर त्यांच्यासाठी यंदाच्या वर्षातले आव्हान संपुष्टात येईल.
'या' संघांसाठी आशेचा किरण
आरसीबी, केकेआर, सनरायझर्स, लखनौ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स यांना गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या पराभवामुळे थोडा दिलासा मिळणार आहे. कोलकात्याला वगळले तर उर्वरित संघ 16 गुण मिळवू शकतात. परंतु कोलकाता हा असा एकच संघ आहे जो फक्त 14 गुण मिळवू शकतो. त्यामुळे कोलकातासाठी प्लेऑफची शर्यत कठीण आहे. दिल्ली कॅपिटल्स देखील 14 गुणांवर आपले आव्हान संपुष्टात आणू शकते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
MI vs GT : गुजरातचा पराभव निश्चित.. 12 मे रोजी मुंबई कधीच हारली नाही, पाहा योगायोग