CSK CEO Kasi on Stephen Fleming: भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षपदाबाबत सध्या विविध चर्चा सुरु आहे. आगामी टी-20 विश्वचषकानंतर (ICC T-20 World Cup) राहुल द्रविड (Rahul Dravid) यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपणार आहे. तसेच राहुल द्रविड कार्यकाळ वाढवण्याच्या तयारीत नाही. त्यामुळे बीसीसीआयकडून नवीन प्रशिक्षकाचा शोध सुरु आहे.
बीसीसीआयकडून गौतम गंभीरचा देखील विचार सुरु आहे. तर न्यूझीलंडचे दिग्गज खेळाडू स्टीफन फ्लेमिंग यांना भारताचे नवे प्रशिक्षक बनवले जाऊ शकते, असे सांगितले जात आहे. याबाबत बीसीसीआय देखील स्टीफन फ्लेमिंग नावाचा विचार करत असल्याची माहिती समोर आली होती. फ्लेमिंग आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून या पदासाठी कधी अर्ज करतात याची बीसीसीआयचे अधिकारी वाट पाहत आहेत. याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे.
चेन्नई संघाचे सीईओ काशी विश्वनाथन काय म्हणाले?
चेन्नई सुपर किंग्सच्या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत चेन्नई संघाचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी भारतीय संघाचे प्रशिक्षकपद आणि स्टीफन फ्लेमिंग यांच्याबाबत खुलासा केला आहे. काशी विश्वनाथन म्हणाले की, मला अनेक पत्रकारांचे फोन येत होते. स्टीफन फ्लेमिंग भारतीय संघाचे प्रशिक्षकपदासाठी अर्ज दाखल करणार आहेत का?. असे प्रश्न मला विचारण्यात आले. यानंतर मी स्टीफन फ्लेमिंगला गंमतीत विचारले की, तुम्ही भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज दाखल केला आहे का?, यावर स्मितहास्य करत तुम्हाला वाटतं का मी अर्ज दाखल करु?, असा प्रतिप्रश्न स्टीफन फ्लेमिंग यांनी काशी विश्वनाथन यांना विचारला. तसेच स्टीफन फ्लेमिंग अर्ज दाखल करणार नाही, असं मला वाटतं. कारण त्यांना 10 महिने व्यस्त राहणे आवडत नाही, असा खुलासाही काशी विश्वनाथन यांनी या मुलाखतीत केला.
कोण आहे स्टीफन फ्लेमिंग?
2009 पासून चेन्नई सुपर किंग्सचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग हे नव्या प्रशिक्षकाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. असे झाले तर येत्या काही वर्षांत भारतीय क्रिकेटची स्थिती बदलण्याची शक्यता आहे. फ्लेमिंगकडे उत्तम व्यवस्थापन कौशल्य आहे आणि त्याला सकारात्मक वातावरण निर्माण करून खेळाडूंकडून सर्वोत्तम कामगिरी कशी मिळवायची हे माहीत आहे. आयपीएलमधील चेन्नईचे प्रशिक्षक म्हणून त्याच्या यशाच्या टक्केवारीमुळे त्याच्याकडे टीम इंडियाचे नवीन प्रशिक्षक म्हणूनही पाहिले जात आहे.
नवीन प्रशिक्षकाचा कार्यकाळ किती?
टीम इंडियाच्या नवीन मुख्य प्रशिक्षकाचा कार्यकाळ 1 जुलै 2024 पासून सुरू होईल, जो 31 डिसेंबर 2027 पर्यंत चालेल. नवीन मुख्य प्रशिक्षकाच्या कार्यकाळात, टीम इंडिया एकूण 5 ICC ट्रॉफी खेळणार आहे, ज्यात चॅम्पियन्स ट्रॉफी, T20 विश्वचषक, एकदिवसीय विश्वचषक आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या 2 चषकांचा समावेश आहे.
संबंधित बातम्या:
आतापर्यंत तीन दिग्गजांनी धुडकावला भारतीय प्रशिक्षकपदाचा प्रस्ताव; फक्त 5 दिवस राहिले शिल्लक