IPL 2023, LSG vs MI : अटीतटीच्या लढतीत लखनौने मुंबईचा पाच धावांनी पराभव केला.  178 धावांचा पाठलाग करताना मुंबईला लखनौने 172 धावांवर रोखले. लखनौने या विजयासह तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. ईशान किशन याचे वादळी अर्धशतक व्यर्थ गेले. लखनौच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर मारा केला. शिवाय फिल्डिंगही जबरदस्त केली. मोक्याच्या क्षणी निकोलस पूरन याने जबरदस्त झेल घेत सामना फिरवला. 


178 धावांचा पाठलाग करताना मुंबईने दमदार सुरुवात केली. ईशान किशन आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी मुंबईला दमदार सलामी दिली. दोघांनी आक्रमक फलंदाजी करत डावाला आकार दिला. रोहित शर्मा आणि ईशान किशन यांनी पहिल्या विकेटसाठी 58 चेंडूत 90 धावांची भागिदारी केली.  चांगली सुरुवात मिळाल्यानंतर रोहित शर्माने पुन्हा एकदा विकेट फेकली. रोहित शर्माला मोठी खेळी करता आली नाही. रोहित शर्माने 25 चेंडूत 37 धावांची खेळी केली. या खेळीत रोहित शर्माने तीन षटकार आणि एक चौकार लगावला. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर ईशान किशन याने डावाची सुत्रे हातात घेतली. ईशान किशन याने चौफेर फटकेबाजी केली. ईशान किशन याने 39 चेंडूत 59 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने एक षटकार आणि आठ चौकार लगावले. 






सूर्यकुमार यादव याला मोठी खेळी करता आली नाही. सूर्यकुमार यादव अवघ्या सात धावा काढून तंबूत परतला. यश ठाकूर याने सूर्याचा अडथळा दूर केला. सूर्याकुमार यादव याच्यानंतर नेहला वढेरा आणि टिम डेविड यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण मोठा फटका मारण्याच्या प्रयत्न वढेरा बाद जाला. नेहल वढेरा 16 धावांवर बाद झाला. या खेळीत वढेरा याने दोन चौकार लगावले. विष्णू विनोद दोन धावांवर बाद झाला.. निकोलस पूरन याने जबराट झेल घेत विष्णू विनोदचा डाव संपुष्टात आणलाय. 


चांगल्या सुरुवातीनंतर मुंबईच्या फलंदाजांनी हराकिरी केली. सुर्यकुमार यादव, नेहल वढेरा, विष्णू विनोद यांना मोठी खेळी करता आली नाही. टिम डेविड याला फिनिशिंग करता आली नाही. डेविड 32 धावांवर नाबाद राहिला. लखनौकडून रवि बिश्नोई आणि यश ठाकूर यांनी भेदक मारा केल. दोघांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या.