IPL 2023 : यजमान हैदराबादला लखनौने शनिवारी सात विकेटने पराभूत केले होते. हा सामना दोन्ही संघासाठी निर्णायक होता, त्यामुळे गरमागरमी पाहयला मिळाली. दोन्ही संघ आक्रमक झाले होते. या सामन्यात आयपीएलच्या आचार संहितेचे उल्लंघन झाल्याचे समोर आले. त्यानंतर संबधित खेळाडूवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. सामन्यानंतर बीसीसीआयने हैदराबादचा यष्टीरक्षक फलंदाज हेन्रिक क्लासेन याच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे. तसेच लखनौचा गोलंदाज अमित मिश्रालाही खडसावले आहे.


सामना झाल्यानंतर बीसीसीआयने संकेतस्थळावर याबाबतची माहिती दिली आहे. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हैदराबाद आणि लखनौ यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान आयपीएलच्या आचार संहितेतील नियमांचा भंग झाला आहे. त्याप्रकरणी क्लासेनवर सामना शुल्काच्या 10 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे, तसेच अमित मिश्राला खडसावण्यात आले. 


हैदराबादचा यष्टीरक्षक 'क्लासेन याने आयपीएलच्या आचार संहितेतील कलम २.७ अंतर्गत लेव्हल 1 ची चूक मान्य केली आहे. हे कलम सार्वजनिक टीका किंवा अयोग्य टिप्पणीचा वापर केला जाण्याबद्दल आहे. क्लासेन याचा फलंदाजीवेळी नो-बॉलवरून पंचांशी वाद झाला होता.  त्याच कारणामुळे त्याच्यावर ही कारवाई झाल्याचे अंदाज व्यक्त होत आहेत.


लखनौ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज आवेश खानने शेवटच्या षटकातील तिसरा चेंडू टाकला, ज्याला पंचांनी नो बॉल दिला.  त्यानंतर लखनौ सुपर जायंट्सने पंचांच्या निर्णयाविरुद्ध रिव्ह्यू घेण्याचा निर्णय घेतला. चेंडूचा आढावा घेतला, त्यामध्ये  आवेश खानचा चेंडू नो बॉल असल्याचे स्पष्ट दिसत होते, कारण चेंडू स्टम्पपेक्षा जस्त उंचीने जात होता.  परंतु  थर्ड अंपायरने मैदानावरील पंचाचा निर्णय रद्द केला आणि नो बॉल नसल्याचे म्हटले.  तिसऱ्या पंचांच्या निर्णयावर क्लासेन खूश नव्हता. तो पंचांकडे याबद्दल तक्रार करताना दिसला होता.


बीसीसीआयने मिश्रालाही खडसावलं


गोलंदाजी करताना अमित मिश्रा याने अखिलाडूवृत्तीचे दर्शन घडवले होते.  अमित मिश्राला आयपीएलच्या आचार संहितेचा भंग केल्याबद्दल फटकारण्यात आले आहे. त्यानेही कलम 2.2 अंतर्गत लेव्हल 1 ची चूक मान्य केली आहे. हैदराबादच्या अनमोलप्रीत सिंहला बाद केल्यानंतर अमित मिश्रा याने जोरदार सेलिब्रेशन केले होते. अमित मिश्राने चेंडू जोरात जमिनिवर आदळला होता आणि अनमोलप्रीतकडे रोखून त्याने पाहिले होते. त्याच्या याच कृतीमुळे त्याला फटकारले.






 


आणखी वाचा :


IPL 2023 : लखनौच्या प्रशिक्षकाचे लाजीरवाणं कृत्य, पंचांना दाखवली मिडल फिंगर