RR vs RCB, IPL 2023 : फाफ डु प्लेलिस आणि मॅक्सवेल यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर आरसीबीने पाच विकेटच्या मोबदल्यात १७१ धावांपर्यंत मजल मारली. फाफ डु प्लेसिसने संयमी अर्धशतक झळकावले, तर मॅक्सवेल याने वादळी अर्धशतक झळकावले. अखेरच्या षटकात अनुज रावतने वादळी फलंदाजी करत आरसीबीचा डाव १७१ पर्यंत पोहचवला. राजस्थानला विजयासाठी १७२ धावांचे आव्हान दिलेय. आज पराभूत होणाऱ्या संघाचे प्लेऑफमधील आव्हान जवळपास संपुष्टात येणार आहे. त्यामुळे दोन्ही संघासाठी आजचा सामना महत्वाचा आहे.
 
नाणेफेक जिंकून आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसिस याने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राजस्थानच्या संघात तीन फिरकी गोलंदाज होते.. राजस्थानच्या गोलंदाजीपुढे आरसीबीच्या फलंदाजांनी संथ सुरुवात केली. विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिस यांनी संयमी फलंदाजी केली. सात षटकात दोघांनी ५० धावांची सलामी दिली. केएम आसिफ याने विराट कोहलीला बाद करत आरसीबीला पहिला धक्का दिला. विराट कोहलीने १९ चेंडूत १८ धावांची खेळी केली. यामध्ये विराटने एक चौकार लगावला. विराट कोहली बाद झाल्यानंतर फाफ डु प्लेसिसने मॅक्सवेलच्या साथीने डाव आरसीबीचा डाव सावरला. दुसऱ्या विकेटसाठी दोघांनी ६९ धावांची भागिदारी केली. 


फाफ डु प्लेसिस याने संयमी फलंदाजी करत अर्धशतक झळकावले. फाफ डु प्लेसिस याने ४४ चेंडूत ५५ धावांची खेळी केली. या खेळीत फाफने दोन षटकार आणि तीन चौकार लगावले. कर्णधार फाफ बाद झाल्यानंतर आरसीबीचा डाव ढेपाळला. ११९ धावांवर दुसरी विकेटपडल्यानंतर लागोपाठ तीन विकेट पडल्या. आरसीबीच्या फलंदाजांनी ठरावीक अंतराने विकेट फेकली. एका बाजूला विकेट पडत असताना दुसऱ्या बाजूला मॅक्सवेलने धावांचा पाऊस पाडला. मॅक्सवेलने ३३ चेंडूत ५४ धावांची खेळी केली. या खेळीत मॅक्सवेलने तीन षटकार आणि पाच चौकार लगावले. 


फाफ आणि मॅक्सवेलचा अपवाद वगळता इतर फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. विराट कोहली १८, महिपाल लोमरोर एक, दिनेश कार्तिक याला खातेही उघडता आले नाही. अनुभवी दिनेश कार्तिक पुन्हा एकदा फ्लॉप ठरला.  कार्तिकला शून्यावर झम्पाने तंबूत पाठवले. अखेरीस अनुज रावत याने वादळी फलंदाजी करत आरसीबीचा डाव १७१ धावांपर्यंत पोहचवला. मायकल ब्रेसवेल ९ धावांवर नाबाद राहिला. तर अनुज रावतयाने ११ चेंडूत नाबाद २९ धावांची खेळी केली. या खेळीत रावतने दोन षटकार आणि तीन चौकार लगावले. 


राजस्तानकडून सर्वाच गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर मारा केला. केएम आसिफ आणि एडम झम्पा यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. तर संदीप शर्मा याने एक विकेट घेतल्या. यजवेंद्र चहल, आर अश्विन यांना विकेट मिळाली नाही.