SRH vs RR IPL 2024 : नितीश रेड्डीचं विस्फोटक अर्धशतक आणि हेनरिक क्लासेनचा फिनिशिंग टचच्या जोरावर हैदराबादने राजस्थानसमोर 202 धावांचे विराट आव्हान ठेवलं आहे. हैदराबादने प्रथम फलंदाजी कराताना निर्धारित 20 षटकात तीन विकेटच्या मोबदल्यात 201 धावांपर्यंत मजल मारली. हैदराबादकडून नितीश रेड्डी यानं नाबाद 76, क्लासेन यानं नाबाद 42 आणि ट्रेविस हेड यानं 58 धावांचं योगदान दिलं.


हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स यानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण हैदराबादची सुरुवात अतिशय खराब झाली. सलामी फलंदाज अभिषेक शर्मा स्वस्तात तंबूत परतला. अभिषेक शर्माला आवेश खान यानं तंबूचा रस्ता दाखवला. अभिषेकने 10 चेंडूमध्ये एका षटकाराच्या मदतीने 12 धावांचं योगदान दिलं. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अनमोलप्रीत सिंह यालाही छाप पाडता आली नाही. अनमोलप्रीत सिंह फक्त पाच धावा काढून बाद झाला. हैदराबादची सुरुवात खराब झाल्यामुळे राजस्थानचा संघ कुरघोडी करणार असेच वाटले होते. पण हेड आणि रेड्डी यांनी डाव हाणून पाडला. 


दोन विकेट झटपट गेल्यानंतर ट्रेविस हेड आणि नितीश रेड्डी यांनी डावाची सुत्रे हातात घेतली. हेड शांत खेळत होता, तर रेड्डीने चौफेर फटकेबाजी केली. दोघांनी हैदराबादच्या डावाला आकार दिला. मधल्या षटकात दोघांनीही फिरकी गोलंदाजांचा समाचार घेतला. अश्विन आणि चहल यांच्या गोलंदाजीवर धावांचा पाऊस पाडला. चहलच्या चार षटकात सहा षटकार ठोकले. खासकरुन रेड्डी आक्रमक फलंदाजी करत होता. रेड्डी आणि हेड यांनी तिसऱ्या विकेटसाठी 57 चेंडूत 96 धावांची भागिदारी केली. 


ट्रेविस हेड यानं 44 चेंडूमध्ये संयमी 58 धावांची खेळी केली. यामध्ये सहा चौकार आणि तीन षटकार ठोकले. हेड यानं शांततेत एक बाजू लावून धरली, दुसऱ्या बाजूने रेड्डीने राजस्थानची गोलंदाजी फोडली. हेड बाद झाल्यानंतर क्लासेन आणि रेड्डी यांनी विस्फोटक फलंदाजी केली. दोघांनी अखेरच्या षटकात अर्धशतकी भागिदारी केली. नितीश रेड्डी यानं 42 चेंडूमध्ये नाबाद 76 धावांची खेळी केली. यामध्ये आठ षटकार आणि तीन चौकारांचा समावेश आहे. हेनरिक क्लासेन यानं 19 चेंडूमध्ये तीन षटकार आणि तीन चौकार ठोकले. क्लासेन आणि रेड्डी यानं 32 चेंडूमध्ये नाबाद 70 धावांची भागिदारी केली.


चहल महागडा - 


युजवेंद्र चहलची गोलंदाजी हैदराबादने फोडली. चहलच्या चार षटकामध्ये 62 धावा निघाल्या. चहलच्या गोलंदाजीवर सहा षटकार आणि चार चकार लगावण्यात आले. अश्विन यालाही विकेट मिळाली नाही. अश्विनने चार षटकात 36 धावा खर्च केल्या. बोल्टलाही विकेट मिळाली नाही. आवेश खान यानं 39 धावांच्या मोबदल्यात दोन विकेट घेतल्या. संदीप शर्माला एक विकेट मिळाली. 


दोन्ही संघांच्या प्लेइंग 11


सनरायझर्स हैदराबाद – ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, अनमोलप्रीत सिंग, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), नितीश रेड्डी, अब्दुल समद, शाहबाज अहमद, मार्को जॅन्सन, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, टी नटराजन


इम्पॅक्ट प्लेअर्स – उमरान मलिक, मयंक मार्कंडे, एडन मार्करम, सनवीर सिंग, जयदेव उनाडकट


राजस्थान रॉयल्स – यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार/यष्टीरक्षक), रियान पराग, ध्रुव जुरेल, रोवमन पॉवेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, युझवेंद्र चहल, संदीप शर्मा


इम्पॅक्ट प्लेअर्स – जोस बटलर, टॉम कोहलर-कॅडमोर, शुभम दुबे, नवदीप सैनी, तनुष कोटियन